जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२४ । राज्यातील गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून गव्हाच्या किंमतीत विक्रमी वाढ झालीय. सध्या प्रतिक्विंटल गव्हाला 2500 ते 3900 रुपयांचा दर मिळत आहे. त्यामुळं गहू उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होत आहे.
देशातील एकूण उत्पादनापैकी राज्यात फक्त 2 टक्केच गव्हाचं उत्पादन होतं, म्हणून राज्याच गव्हाच्या किंमती वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. एमएसपीपेक्षा सध्या गव्हाचे दर अधिक आहेत. सरकारने चालू वर्षासाठी गव्हाचा एमएसपी 2275 रुपये ठेवला आहे. अनेक बाजार समित्यांमध्ये गव्हाला सरासरी 3450 रुपये प्रतिक्विंट असा दर मिळत आहे. सरकारी हमीभावाचा विचार केला तर त्यापेक्षा बाजारात गहू 25 ते 30 टक्के अधिक दरानं विकला जातोय.
एका बाजूला गव्हाचे दर वाढतायेत, तर दुसऱ्या बाजूला कांद्याचे दर घसरतायेत. त्यामुळं अनेक शेतकरी कांद्याची शेती सोडून गव्हाची शेती करत आहेत. गव्हाच्या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसतोय. कारण सध्या गव्हाला अपेक्षीत दर मिळत आहे.
गव्हाला हवामानाचा मोठा फटका
मागील वर्षी पावसाचं प्रमाण कमी होतं. त्यामुळं अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांकडे गव्हाची लागवड करायला देखील पैसे नव्हते. तर काही शेतकऱ्यांनी लावलेल्या गव्हाला हवामानाचा मोठा फटका बसला. या दोन्ही गोष्टीचा गव्हाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झालाय. सध्या गव्हाचे उत्पादन घटले आणि मागणीत वाढ झालीय. त्यामुळं दरात वाढ होताना दिसतेय.