जळगाव लाईव्ह न्यूज । १ सप्टेंबर २०२५ । जळगाव जिल्ह्यातून आणखी एका खुनाची घटना समोर आली आहे. अमळनेरात पिता पुत्रामध्ये झालेल्या किरकोळ वादातून संतप्त झालेल्या मुलाने लोखंडी हातोडीने वडिलांच्या डोक्यात प्रहार करून त्यांना ठार केल्याची घटना समोर आलीय. राजेंद्र दत्तात्रय कासार (वय ६४) असे घटनेत मृत झालेल्या व्यक्तीचे नाव असून या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणी मुलगा भूषण कासार विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

काय आहे घटना?
अमळनेर शहरातील शिरूड नाका परिसरातील ३६ खोली भागात वास्तव्यास असलेले राजेंद्र कासार व त्यांचा मुलगा भूषण यांच्यात रात्रीच्या सुमारास क्षुल्लक कारणातून वाद सुरु झाला होता. यामुळे संताप अनावर झालेल्या भूषणने घरात पडलेली लोखंडी हातोडी घेत वडिलांच्या डोक्यात जोराने वार केले.

डोक्यात वार करण्यात आल्याने राजेंद्र कासार हे जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळले. घटनेची माहिती पोलिसांना कळविली. यानंतर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, सपोनि सुनील लोखंडे, पोलिस उपनिरीक्षक शरद काकळीज पथकासह घटनास्थळी दाखल झाले. यानंतर राजेंद्र यांना ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले.
पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात चौकशी केली असता राजेंद्र याचा मुलगा भूषण यानेच त्याच्या डोक्यात लोखंडी हातोडी टाकून मारले असल्याची माहिती मिळाली. यानंतर फॉरेन्सिक पथकाने घटनस्थळवरून काही नमुने घेतले व लोखंडी हातोडी जप्त करण्यात आली. तर भूषण याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. मात्र, खुनाचे नेमके कारण समजू शकले नाही.












