जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव येथील समर्पण संस्था संचलित शारदाश्रम आणि श्रीमती सुभद्रा लक्ष्मण चौधरी विद्यालयाने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये लक्षणीय यश संपादन केले आहे. विद्यालयाने स्थापनेपासून सलग सातव्या वर्षी एसएससी बोर्ड परीक्षेत १००% निकाल नोंदवून आपल्या उत्कृष्ट शैक्षणिक परंपरा कायम ठेवली आहे.

यावर्षी एकूण २८ विद्यार्थी एसएससी परीक्षेस बसले होते आणि सर्वांनीच उत्तम यश प्राप्त केले आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, ४ विद्यार्थ्यांनी ९५% गुण मिळवले आहेत. यामध्ये सोनम बनवारी सैनी, कार्तिकी हेमंत चौधरी, पार्थ दिनेश माली आणि रुचिता श्याम पाटील यांचा समावेश आहे. याशिवाय, ५ विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा अधिक, ८ विद्यार्थ्यांनी ८०% पेक्षा अधिक आणि ९ विद्यार्थ्यांनी ७०% पेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत, तर २ विद्यार्थ्यांनी ६०% पेक्षा अधिक गुण मिळवले आहेत.
या शानदार यशाबद्दल बोलताना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. चेतना नन्नवरे म्हणाल्या, “हे यश आमच्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. विद्यार्थ्यांची कठोर मेहनत आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच हे शक्य झाले आहे. संस्थेचे व्यवस्थापन आणि पालकांनीही आम्हाला सतत प्रोत्साहन दिले. या यशासाठी मी सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करते आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देते.”
समर्पण संस्थेने आणि विद्यालयाने या यशासाठी विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. तसेच, यापुढील शैक्षणिक वाटचालीतही एकत्रितपणे असेच यश संपादन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.