⁠ 
मंगळवार, एप्रिल 30, 2024

भुसावळ रेल्वे स्थानकावर घडला धक्कादायक प्रकार ; 10 ते 15 विक्रेत्यांविरुद्ध गुन्हा, अकरा जणांना अटक

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ एप्रिल २०२४ । भुसावळ येथील रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म ५ आणि ६ वरील स्टॉलवरून विक्रेत्यांमध्ये वाद सुरू होते. हे वाद सोडवण्यासाठी गेलेले आरपीएफ निरीक्षक आर. के. मीणा व सहकाऱ्यांवर विक्रेत्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना २ एप्रिल रोजी घडली. एक कर्मचारी जखमी झाला आहे. याप्रकरणी १० ते १५ अवैध विक्रेत्यांविरुद्ध लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अकरा जणांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत असे की, भुसावळ रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक पाचच्या जळगाव बाजूकडे मद्रास बेकरीच्या नवीन स्टॉलचे उद्घाटन झाले असून त्या ठिकाणी उद्घाटनासाठी आलेले लोक व फलाट क्रमांक सहावरील एम. आर. इंटरप्रिटेशनचे वेंडर आणि इतर बाहेरील लोक असे एकूण सुमारे १५० जण जमा झाले व मद्रास बेकरीच्या नवीन स्टॉलच्या कारणावरून दोन्ही गटांमध्ये आपसात वाद सुरू झाला. आरपीएफ निरीक्षक मीना यांनी या घटनेबाबत लोहमार्ग ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक भाऊसाहेब मगरे यांना माहिती दिली व तत्काळ पथकास पाठविण्यास सांगितले.

घटनास्थळी पथक पोहचले असता एम. आर. इंटरप्राइजेसचे सुपरवायझर अफसर रफिक मेमन, रियाज अब्दुल मोहम्मद रेहमान, शेख कलिमोद्दीन शेख अलिमोद्दीन, शेख नदीम नथ्थू बागवान तसेच मद्रास बेकरीचे सय्यद हमीद सय्यद कासीम, रईस सद्दाम बागवान (रईस पहिलवान), सय्यद कासीम सय्यद हमीद, शेख इरफान शेख चाँद तथा दोन्ही गटांचे सुमारे १५० जणांना आरपीएफ व जीआरपी यांनी वाद सोडवून शांत केले व मुख्य व्यक्तींना आरपीएफ पोलिस ठाण्यात घेऊन गेले.

या घटनेतील फिर्यादी व त्यांचे सहकारी फलाटावरील बेकायदेशीर जमाव नियंत्रण करीत असताना फलाट क्रमांक पाच व सहावरील पुलाजवळ बेकायदेशीर जमावातील सद्दाम शेख बशीर, आझाद शेख बशीर, शेख सलमान शेख बशीर, मुझफ्फर सय्यद लियाकत अली, शेख समीर शेख हमीद, वसीम खान बिस्मिल्ला खान व इतर संशयितांनी मिळून फिर्यादी व त्यांचे सहकारी आरपीएफ कर्मचारी महेंद्र कुशवाह यांच्यावर अचानक हल्ला केला व फिर्यादीला धक्काबुक्की करून कॉलर पकडून हाताने व लाथाने मारहाण करून चेहऱ्यावर गंभीर जखमी केले. या प्रकरणी रेल्वे लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अकरा संशयितांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक भाऊसाहेब मगरे करीत आहेत.