जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑक्टोबर २०२४ । सध्या नवरात्रोत्सव सुरु असून यादरम्यान यावल तालुक्यातील सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी मातेच्या दर्शनासाठी दूरवरून भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र याच दरम्यान एक दुर्दैवी घटना समोर आलीय. मनुदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या निजामपूर येथील प्रतिष्ठीत व्यापाऱ्याच्या पुत्राच्या कारला भीषण अपघात झाला. यात तिघांचा मृत्यू झाला. या ही घटना आज मंगळवारी चोपडा-धरणगाव रस्त्यावर चोपडा सुत गिरणी नजीक घडली आहे. तर या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर चोपडा शहरात उपचार सुरू आहेत
या घटनेबाबत असे की, निजामपूर येथील प्रतिष्ठीत व्यापारी श्रीधर बंडू राणे यांचे पुत्र निलेश (वय 40) आणि शैलेश (वय38) हे त्यांचे मित्र जितेंद्र मुरलीधर भोकरे (४८) यांच्यासह कारने मनूदेवीच्या दर्शनासाठी येत होते. रात्री ते नाशिक येथून निघाले होते. मनुदेवी मातेला त्यांच्या मार्फत आज महाप्रसादचे आयोजन करण्यात आले होते. मात्र वाटेतच त्यांच्यावर काळाने झडप घातली.
त्यांच्या कारचे टायर फुटुल्याने कार नियंत्रित होऊन ती चोपडा येथून नाशिककडे जाणाऱ्या शिवशाही बसला धडकली. यामध्ये कारमधील निलेश आणि शैलेश आणि जितेंद्र भोकरे या तिघांचा जागेवर मृत्यू झाला. तर या अपघतात कार चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर चोपडा शहरात उपचार सुरू आहेत. दरम्यान, कारचे टायर फुटल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली. या घटनेनं राणे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.