जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ मे २०२१ । जळगावचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी राज्यातल्या लसीकरणावरून माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला. गिरीशभाऊंना माझा सल्ला आहे. पश्चिम बंगालमध्ये अमित शहा यांनी गिरीशभाऊंना वर स्टेजवर बोलावले होते. जर त्याचा काही प्रभाव पडला असेल तर जास्तीत जास्त लस जळगावसाठी आणि महाराष्ट्रासाठी त्यांनी आणावी. गिरीशभाऊंनी आवश्यक तो लसींचा साठा महाराष्ट्रासाठी मिळवून दिला तर त्यांचा मी भरचौकामध्ये सत्कार करीन, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली .
दरम्यान, राज्यात सुरू असलेला लसीकरणाचा कार्यक्रम आणि उपलब्ध होणारा लसीचा साठा या मुद्द्यावरून देखील गुलाबराव पाटील यांनी गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला. “जर राज्य सरकार पूर्ण लसी घ्यायला तयार असेल, तर लस देण्याचा अधिकार कुणाला आहे हे मी सांगण्यापेक्षा गिरीशभाऊंना चांगलं माहिती आहे.
राजकारण कोण करतंय हे गिरीश भाऊंना माहिती आहे. जर लसी पूर्ण उपलब्ध असल्या, तर महाराष्ट्र सरकारची आरोग्य यंत्रणा एवढी सज्ज आहे की दोन ते अडीच महिन्यांत पूर्ण राज्याला लसीकरण करू शकते. पण जोपर्यंत लसीकरणाचा कोटा आपल्याकडे येत नाही, तोपर्यंत इथे परमेश्वर जरी आला, तरी लसीकरण पूर्ण होऊ शकत नाही”, असं ते म्हणाले.