जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२१ । रेमडेसिविर इंजेक्शन्सची समस्या सध्या संपूर्ण राज्याला भेडसावत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून यावरुन सुरु असलेल्या टीव्हीवरच्या बातम्या बघून आता मलाही कंटाळा आला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अशा परिस्थितीत महाराष्ट्राला मदत करणे अपेक्षित होते, असे मत राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.

राज्यात कोरोनाची संख्या दिवसागणिक वाढत असून यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. बाधित रुग्णांसाठी रेमडेसिविर इंजेक्शनची मात्रा बऱ्याच प्रमाणात लागू पडत असतानाच इंजेक्शनसाठी अक्षरशः अव्वाच्या सव्वा भाव देऊन काळ्या बाजारातून खरेदी केलं जात आहे. रेमडेसिवीरचा काळा बाजार थांबवण्यासाठी प्रशासनाने पावले उचलले असून या इंजेक्शनमध्ये भेसळ करून विक्री करणाऱ्या अनेक टोळ्यांना देखील पोलिसांनी गजाआड केलं आहे. दरम्यान, राज्यात रेमडेसिविर इंजेक्शन वरून राजकारण तापल्याच पाहायला मिळत आहे.
ते मंगळवारी जळगावात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी गुलाबराव पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वर्तनाविषयी नाराजी व्यक्त केली. जनतेचा जीव वाचवण्यासाठी रेमडेसिविर इंजेक्शन गरजेचे असताना विरोधी पक्षनेत्यांनी त्यासाठी पोलीस ठाण्यात जाणे, ही शरमेची बाब असल्याचे त्यांनी म्हटले.
त्यांनी तेथे न जाता रेमेडीसेवव्हीर राज्यातील जनतेला कसे मिळेल यासाठी पंतप्रधानांकडे प्रयत्न केले असते तर त्यांचीही वाहवा झाली असती. तेही राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत केंद्रातही त्यांचे सरकार आहे. रेमेडीसेवव्हीर हा राज्याला भेडसावणारा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांच्यात राजकारण न करता ज्या प्रमाणे त्यांनी लॉकडाऊन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत भाग घेतला होता, त्याचप्रमाणे रेमडेसिविर मिळवून देण्यासाठी फडणवीसांनी मदत करायला पाहिजे होती, ही जनतेची अपेक्षा होती. मात्र, ते पोलीस ठाण्यात गेले, ही शरमेची बाब आहे, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले. रेमडेसिविर इंजेक्शनच्या मुद्द्यावरुन रंगलेल्या राजकारणाला आता आणखीन धार चढण्याची शक्यता आहे.