जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांनंतर सर्वांचे लक्ष लागून असलेल्या जळगाव महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने दणदणीत विजय मिळवत आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. खान्देशची ‘मुलुखमैदान तोफ’ म्हणून ओळखले जाणारे नामदार गुलाबराव पाटील यांचा दबदबा आजही कायम असल्याचे या निकालांवरून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर झालेली ही पहिलीच मोठी निवडणूक होती, ज्यात शिवसेनेने २३ पैकी तब्बल २२ जागा जिंकून विरोधकांना चारी मुंड्या चित केले आहे.
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत जळगाव महापालिकेत शिवसेनेचे १५ नगरसेवक निवडून आले होते. मात्र, यंदा गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने मोठी झेप घेतली आहे. निवडून आलेल्या २२ नगरसेवकांव्यतिरिक्त एका अपक्ष उमेदवारानेही शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला असून, यामुळे पक्षाची ताकद २३ वर पोहोचली आहे. हा विजय म्हणजे केवळ आकड्यांचा खेळ नसून ना. गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर मतदारांनी दाखवलेला दृढ विश्वास असल्याचे बोलले जात आहे.

काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्येही शिवसेनेचा मोठा वरचष्मा राहिला होता. अनेक ठिकाणी भाजपापेक्षा अधिक नगरसेवक निवडून आणण्यात शिवसेना यशस्वी झाली होती. तोच यशाचा सिलसिला आता जळगाव महापालिकेतही कायम राहिला आहे. विशेष म्हणजे, केवळ जळगावच नव्हे तर संपूर्ण राज्यात जिथे जिथे गुलाबराव पाटील यांच्या सभा झाल्या, तिथे तिथे शिवसेनेच्या उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळला आहे.

जळगावच्या या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, गुलाबराव पाटील यांचा करिष्मा आजही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निकालाने खान्देशातील शिवसेनेची पकड अधिक घट्ट केली असून आगामी निवडणुकांसाठी हे मोठे संकेत मानले जात आहेत.




