जळगाव लाईव्ह न्यूज । १ जानेवारी २०२६ । जळगाव महापालिकेत शिवसेना शिंदे गटाचा आणखी एक उमेदवार बिनविरोध झाला आहे. गौरव सोनवणे, मनोज चौधरी यांच्यानंतर प्रभाग 9 ‘ब’मध्ये प्रतिभा देशमुख यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. यामुळे महापालिकेत महायुतीचा चौथा उमेदवार तर शिवसेना शिंदे गटाच्या तिसऱ्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे.
जळगाव महापालिकेत आधी प्रभाग क्रमांक 18-अ मधून शिवसेना आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे चिरंजीव डॉ गौरव चंद्रकांत सोनवणे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. 18-अ मधून उद्धवसेनेचे उमेदवार मयूर चंद्रशेखर सोनवणे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने गौरव सोनवणे याची बिनविरोध निवड झाली

यांनतर प्रभाग क्रमांक ९ अ मधून मनोज चौधरी यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या विरोधातील एकमेव अपक्ष उमेदवाराने माघार घेतल्यामुळे चौधरी यांच्या बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला. यानंतर आता प्रभाग 9 ‘ब’ मधून अपक्ष उमेदवार प्रतिभा पाटील यांनी माघार घेतल्याने प्रतिभा देशमुख या बिनविरोध झाल्या आहेत. सलग तिसऱ्या उमेदवाराच्या बिनविरोधामुळे शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे.

दरम्यान जळगाव महापालिकेत काल भाजपच्या माजी महानगराध्यक्षा उज्ज्वला मोहन बेंडाळे यांची प्रभाग १२ (ब) मधून बिनविरोध निवड झाली होती. तर आज शिवसेनेचे तीन उमेदवार बिनविरोध झाले. यामुळे जळगावात महायुतीच्या चार उमेदवारांची बिनविरोध निवड झालीय.




