जळगाव लाईव्ह न्यूज । १ जानेवारी २०२६ । जळगाव महापालिकेत महायुतीचा तिसरा तर शिवसेना शिंदे गटाचा दुसरा उमेदवार बिनविरोध निवड झाली आहे. डॉ. गौरव सोनवणे यांच्या पाठोपाठ प्रभाग क्रमांक ९ (ड) मधून मनोज चौधरी यांची देखील बिनविरोध निवड निश्चित झाली असून, या घडामोडीमुळे महापालिकेतील सत्ता समीकरणात शिवसेनेने आपला ठसा उमटवला आहे.

जळगाव महापालिकेच्या १९ प्रभागातील ७५ जागांसाठी १०३८ उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. या प्रक्रियेत १३५ अर्ज बाद ठरले आहेत. एकूण ९०३ अर्ज वैध घोषित करण्यात आले आहेत. छाननीदरम्यान तांत्रिक त्रुटी आणि राजकीय समन्वयाच्या अभावामुळे अनेक दिग्गजांचे अर्ज बाद झाले. यामध्ये काही प्रभागांमध्ये विरोधात एकही अर्ज नसल्याने बिनविरोध निवड केली आहे.

यामध्ये काल भाजपच्या माजी महानगराध्यक्षा उज्ज्वला मोहन बेंडाळे यांची प्रभाग १२ (ब) मधून बिनविरोध निवड झाली होती. त्यामुळे भाजपने महापालिकेत खाते उघडले होते. यानंतर आज १८ मधून शिवसेनेचे डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर आणखी एका शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार बिनविरोध झाला आला आहे.

प्रभाग क्रमांक नऊमधून माजी नगरसेवक तथा शिवसेनेचे उमेदवार मनोज सुरेश चौधरी यांच्या विरोधातील उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी महायुतीचे चार उमेदवार बिनविरोध निवडून येणार असल्याचे वक्तव्य केल्यानंतर काही मिनिटांमध्ये मनोज सुरेश चौधरी यांची बिनविरोध निवड झाल्याची बाब ही लक्षणीय मानली जात आहे. यामुळे महापालिकेत महायुतीने दमदार पाऊल टाकल्याचे मानले जात आहे.




