---Advertisement---
राजकारण जळगाव जिल्हा जळगाव शहर

Jalgaon Politics : शिवसेना बाळासाहेबांचीच, डुप्लिकेटांची नाही… जळगावात झळकले पोस्टर

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२२ । राज्यातील घडामोडींनी सर्वांना अवाक केले असून शिवसेना विरुद्ध शिंदे शिवसेना असे चित्र सध्या राज्यात पाहायला मिळत आहे. राज्यात एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे समर्थन केले जात असून दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या समर्थनाचे फलक लागले आहेत. जळगावात देखील पोस्टर झळकले असून शिवसेना बाळासाहेबांचीच, डुप्लिकेटांची नाही, अशा आशयाचे फलक जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी लावले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या विरोधातील फलक झळकले असले तरी एकनाथ शिंदे यांच्या जीवावर मनपात बंडखोरी करणारा अद्याप कुणीही शिंदेंचे समर्थन करायला समोर आलेला नाही. (Eknath Shinde ShivSena)

jalgaon banner

राज्याचे राजकारण वेगळ्याच वळणावर येऊन ठेपले असून आतापर्यंतचा सर्वात मोठा राजकीय इतिहास बदलला जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे तब्बल ४० पेक्षा अधिक आमदार घेऊन बाहेर पडले आहे. एकनाथ शिंदे बंडखोरीच्या पवित्र्यात असून थेट शिवसेनेवरच दावा करण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवसेनेने एकनाथ शिंदे यांचे बंड मोडून काढण्यासाठी कंबर कसली असून विधानसभा उपाध्यक्षांना पत्र दिले आहे. शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्यासह १२ आमदारांची आमदारकी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, शिंदे यांनी देखील ट्विट करून त्याला प्रत्युत्तर दिले आहे.

---Advertisement---

राज्यात सध्या शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे गट असे चित्र पाहायला मिळत आहे. राज्यभर शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले असून दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी बॅनरबाजी सुरु केली आहे. एकनाथ शिंदे हे स्व.बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा हिंदुत्वाचा वारसा पुढे नेत असल्याचे बॅनरवर म्हटले आहे. शिवसेना समर्थक देखील शिंदेंच्या विरोधात नाराजी व्यक्त करीत असून सोशल मीडियात तशा पोस्ट व्हायरल होत आहे. अनेक ठिकाणी बंडखोर आमदारांचे पुतळे दहन, पुतळ्याला जोडे मारो आंदोलन देखील केले जात आहे. धरणगाव येथे देखील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा प्रतीकात्मक पुतळा दहन करण्यात आला होता.
हे देखील वाचा : एकनाथ शिंदेंसह १२ आमदारांची आमदारकी रद्द करा, जळगावच्या एका आमदारांचा समावेश

शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी गुरुवारी सोशल मिडियाद्वारे आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना एक पोस्ट शेअर केली होती. ‘शिवसेना बाळासाहेबांचीच असून डुप्लिकेटांची नाही’ असे त्यात त्यांनी म्हटले होते. जळगावातील अनेक शिवसेना पदाधिकारी आणि समर्थकांनी ही पोस्ट आपल्या फेसबुक, व्हाट्सअँप स्टेटसवर ठेवली होती. जळगावात शुक्रवारी याच आशयाचे पोस्टर झळकले असून महात्मा गांधी मार्गावर दुभाजकांवर जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्याकडून हे पोस्टर लावण्यात आले आहे. एकंदरीत शिवसेना कुणाची हा मोठा प्रश्न आता उभा राहिला असून कायदेशीर लढाईनंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---