जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२३ । आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक काही महिन्यावर आल्या आहेत. यातच गेल्या दोन महिण्यापुर्वी अजित पवारांनी (Ajit Pawar) 40 आमदारांसह राष्ट्रवादीला (NCP) सोडचिठ्ठी दिल्यानंतर राष्ट्रवादीमुळे मोठी फूट पडली असून दोन गट पडले आहेत. यातच अजितदादा गटाचे नेते आणि राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी एक दावा करून शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या तंबूत खळबळ उडवून दिली आहे.
शरद पवार गटाचे आणखी तीन आमदार आमच्याकडे येणार आहेत. लवकरच या तिघांचा प्रवेश होणार आहे, असा दावा धर्मरावबाब यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शरद पवार गटाला धक्का देणारे ते तीन आमदार कोण? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे.
शरद पवार गटाचे आमदार आणि माजी मंत्री राजेश टोपे हे अजितदादा गटात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. तशी जोरदार चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर धर्मरावबाबा आत्राम यांना विचारलं असता त्यांनी थेट मोठी माहितीच दिली. शरद पवार गटाचे आणखी तीन आमदार हे अजितदादा गटात येणार आहेत. सध्या आम्हाला 45 आमदारांचं समर्थन आहे. त्यात तीन आमदार वाढून 48 होणार आहे. तीन आमदार नक्की येणार आहेत. पण त्यांची नावं मी सांगत नाही. पण येणार आहेत हे नक्की. विकासासाठी आमदार आमच्याकडे येत आहेत. विकास कामासाठी निधी मिळत आहे, असा दावा धर्मरावबाबा आत्राम यांनी केला आहे.