मंगळवार, सप्टेंबर 26, 2023

मराठा आरक्षणासंदर्भात शरद पवारांनी केंद्र सरकारला सांगितला मार्ग, म्हणाले…

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ सप्टेंबर २०२३ । गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून यात जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचे संतप्त पडसाद राज्यभरात उमटल्याचे दिसून आले. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आज जळगाव दौऱ्यावर असून सकाळी त्यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी शरद पवारांनी मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारला मार्ग सांगितला आहे.

नेमका काय आहे मार्ग?
ओबीसींच्या कोट्यातून आणखी वाटेकरी करणे हासुद्धा ओबीसी गरीब लोकांवर अन्याय होईल, असं काही लोकांच म्हणणं आहे. हे एकदम दुर्लक्ष करण्यासारखे नाही. त्याला पर्याय हा आहे की, आज जी 50 टक्क्यांची अट आहे, यात आणखी 15 ते 16 टक्क्यांची वाढ करण्यात यावी, या संदर्भातील दुरुस्ती पार्लमेंटमध्ये केंद्र सरकारने करून घेतली, तर हे प्रश्न सुटतील, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त करत एकप्रकारे मराठा आरक्षणासंदर्भात मार्ग सांगितला आहे.

तसेच ओबीसी आणि इतर लोकांमध्ये मतभेद नको, त्यांच्यात वाद करायचा कुणी प्रयत्न करत असेल, तर आमचा त्यांना पाठिंबा नाही, असा सज्जड दमही शरद पवार यांनी दिला आहे.