जळगाव लाईव्ह न्यूज । लाखो रुपये पगार असताना ही सरकारी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना लाच घेण्याचा मोह काही सुटत नाहीय. अशातच एक हजार रूपयांची लाच घेताना पारोळा येथील महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला नंदुरबार येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्यानंतर अमळनेर न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र, न्यायालयाने जामीन नामंजूर करून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. भाऊसाहेब गोरख पाटील (३३), असं लाचेचा आरोप असलेल्या महावितरणच्या तंत्रज्ञाचे नाव आहे

काय आहे प्रकार?
तक्रारदार हे शेतकरी असून त्यांनी २१ जून २०२५ रोजी पत्नीच्या नावाने “मागेल त्याला सौर कृषी पंप योजना” अंतर्गत मौजे पोपटनगर शिवार (ता. पारोळा) येथील त्यांच्या शेतात सौर कृषी पंप बसविण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर केला होता.सदर अर्जानंतर सर्वेक्षणासाठी २० सप्टेंबर २०२५ अशी तारीख निश्चित करण्यात आली होती.

मात्र, त्या दिवशी वीज कंपनीकडून कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी सर्वेक्षणासाठी उपस्थित राहिला नाही. त्यानंतर चार जानेवारी रोजी तक्रारदाराने वरिष्ठ तंत्रज्ञ भाऊसाहेब पाटील यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांनी सर्वेक्षण करून देण्यासाठी १,५०० रुपयांची लाच मागितली. त्यापैकी तडजोडीअंती एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली.

मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने नंदुरबार येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे रितसर तक्रार दाखल केली. लाच पडताळणी पूर्ण झाल्यानंतर नंदुरबारच्या एसीबीनेचोरवड गावी सापळा रचून तक्रारदाराकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारताच वरिष्ठ तंत्रज्ञ भाऊसाहेब पाटील यास रंगेहाथ अटक करण्यात आली. सदर कारवाई नंदुरबार येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत भरते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा पथकातील हवालदार विजय ठाकरे, नरेंद्र पाटील तसेच हेमंतकुमार महाले यांनी कारवाई यशस्वी केली.





