जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑगस्ट २०२४ । जळगावमधून लाचखोरीची आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. जिल्हा परिषदमधील सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ लिपीकाला तब्बल १ लाख ८० हजारांची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केल्याने खळबळ उडाली. नरेंद्र किशोर खाचणे (वय ५२) असं लाच घेणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव असून याप्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमका प्रकार काय?
तक्रारदार हे लोकसेवक असून ते यावल येथील सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केंद्रात शिपाई पदावर कार्यरत आहे. त्यांची स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यक पदावर रावेर पंचायत समिती येथे बदली झाली होती. बदलीच्या ठिकाणी रूजू होण्याकरीता कार्यमुक्त करण्यासाठी नरेंद्र खाचणे यांनी २ लाख रुपयांची मागणी केली होती.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार सापळा रचून बुधवार दि. २१ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून १ लाख ८० हजार रुपयांची लाच स्विकारतांना नरेंद्र खाचणे यास रंगेहाथ पकडण्यात आले. तसेच याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर, पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, एन. एन. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, पोहेकॉ सुरेश पाटील, रविंद्र घुगे, महिला पोहेकॉ शैला धनगर, पो.ना. बाळू मराठे, पो.ना. सुनिल वानखेडे, पोकॉ राकेश दुसाणे, पोकों प्रणेश ठाकुर, पोना किशोर महाजन, पो. कॉ. प्रदीप पोळ, सचिन चाटे, अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने केली.