⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

विद्यापीठातील ७ विद्यार्थ्यांची विविध कंपनीत निवड

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२२ । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाव्दारा ऑनलाईन व ऑफलाईन मुलाखतींव्दारा सात विद्यार्थ्यांची विविध कंपनीत निवड करण्यात आली आहे. 

          विद्यापीठाच्या केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाव्दारा विविध कंपन्यांच्या परिसर मुलाखतींचे आयोजन करुन विद्यार्थ्यांना रोजगाराची सुविधा निर्माण करुन देण्यात येत असते. याचाच एक भाग म्हणून आयोजित केलेल्या  मुलाखतींमध्‍ये पर्यावरणशास्त्र व भूशास्त्र प्रशाळेतील एम.एस्सी. ॲप्लाइड  जिओलॉजी चे संकेत खांके आणि आदित्य टेंभेकर या दोन विद्यार्थ्यांची उर्ध्वम एन्व्हिरमेंट प्रा.लि. पुणे येथे निवड करण्यात आली आहे. तसेच याच प्रशाळेतील विद्यार्थीनी भाविका शिंपी हिची जेनेसिस इंटरनॅशनल कॉर्पोरेशन लि., मुंबई यां कंपनीत निवड करण्यात आली आहे. तसेच   विद्यापीठीय रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या पेंट टेक्नॉलॉजी  व पर्यावरणशास्त्र व भूशास्त्र प्रशाळेच्या एम.एस्सी. ॲप्लाईड जिऑलॉजी च्या विद्यार्थ्यांसाठी ग्रँड मास्टर ग्रुप ॲण्ड इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या.  या मुलाखतींमधून १० विद्यार्थ्यांना कंपनीने शॅार्टलिस्ट केले. या १० विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती कंपनीने औरंगाबाद येथे घेतल्या. कंपनीने अंतिमत: बी.टेक. पेंटसचा मनीष येवले आणि एम.एस्सी. ॲप्लाईड  जिऑलॉजीच्या आचल भगत, विश्वधारणी मुंगणकर व राकेश बारेला या एकूण चार विद्यार्थ्यांची निवड केली आहे. या परिसर मुलाखती आयोजनासाठी प्रशाळेचे प्लेसमेंट समन्वयक प्रा.एस.एन. पाटील व प्लेसमेंट ऑफीसर सोनाली दायमा यांनी प्रयत्न केले. विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. व्ही.एल.माहेश्वरी,प्रभारी प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, प्रभारी कुलसचिव प्रा.के.एफ.पवार, समन्वययक डॉ.रमेश सरदार यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्याचे अभिनंदन केले.