भविष्यात अवकाश क्षेत्रात अनेक संधी – सतीश सेतुमाधव
जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मे २०२३ । भारतीय अवकाश संशोधन संस्था विस्तारत आहे यामुळे भारतात भविष्यात अवकाश क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण होणार आहे. असे प्रतिपादन इस्रो भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ सतीश सेतूमाधव यांनी केले. नोबेल फाउंडेशन व कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी बांभोरी आयोजित राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कार वितरण समारंभ व जाहीर व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी मंचावर माजी शिक्षणाधिकारी डायटचे निवृत्त प्राचार्य निळकंठ गायकवाड अध्यक्षस्थानी होते.तसेच जळगाव जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा कुडचे पवार, सर्व पुरस्कारार्थी मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी विज्ञान क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्था तसेच व्यक्तींचा राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
इस्रो आणि अवकाशाचे भविष्य या विषयावर पुढे बोलताना श्री सेतू माधव म्हणाले की, इस्रोचा प्रवास हा अतिशय शून्यातून सुरू झाला. विक्रम साराभाई ,डॉ. होमी भाभा आणि पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या दूरदृष्टीतून 1954 मध्ये संसदेत अवकाश विषयक बिल पारित झाले. देशाची परिस्थिती अत्यंत गंभीर असताना साराभाईंच्या दृष्टीतून अवकाश क्षेत्राचा पाया रचण्यात आला. पुढे इंडियन कमिटी फॉर स्पेस रिसर्च ची स्थापना होऊन इस्रोचा पाया रोवला गेला. सत्तर वर्षात इस्रो ने अद्वितीय कामगिरी केली आहे. सायकलवर रॉकेट नेणारी इस्रो आज जगातील सर्वात उत्कृष्ट सेवा देणारी स्पेस एजन्सी म्हणून ओळखली जाते. इस्रोचे विस्तारीकरण होत आहे. भविष्यात इस्रो साठी काम करणाऱ्या कंपनीची आवश्यकता राहणार आहे. त्यामुळे तरुणांनी इस्रो मध्ये नोकरीची स्वप्न बघण्यापेक्षा इस्रो साठी उत्पादन करणाऱ्या स्टार्टअप ची निर्मिती करावी असेही ते म्हणाले.
याप्रसंगी नोबेल फाउंडेशनच्या जेईई परीक्षा यशवंत झालेल्या विद्यार्थ्यांचा पालकांसह सत्कार करण्यात आला. तसेच सतीश सेतू माधव यांचा सन्मानपत्र देऊन जळगाव तर्फे नागरी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी निळकंठ गायकवाड यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,समाजाला नोबेल फाउंडेशन सारख्या विज्ञानासाठी वाहून घेतलेल्या संस्थांची गरज आहे. चांगले विद्यार्थी व शिक्षकच देश घडवू शकतात. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना स्नेहा पवार म्हणाल्या की, नोबेल फाउंडेशन मुळे लहान वयात विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञ बघायला मिळत आहेत. आमच्या काळात वयाची पंचविशी आली तरीसुद्धा शास्त्रज्ञ बघायला मिळाले नाहीत. विद्यार्थ्यांना अशा चळवळीतून शास्त्रज्ञ होण्याचे प्रेरणा मिळेल.
याप्रसंगी फाउंडेशनचे महेश गोरडे यांना राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कार तर खगोलशास्त्र अभ्यासक प्रमुख जोशी आणि अंबड जि.जालना येथील मत्स्योदरी विद्यालयाचे कल्याण सोळुंके यांना डॉ. सी व्ही रमण विज्ञान शिक्षक पुरस्कार देण्यात आला. तसेच अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील पल्लवी आढाऊ यांना नोबेल विज्ञान प्रतिभा पुरस्कार देण्यात आला. शाळा गटात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या चोपडा येथील प्रताप विद्यामंदिराला नोबेल विज्ञान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. परीक्षेतील यशवंत श्रुती भगवान पाटील, (एरंडोल),सृष्टी संजय पाटील (जळगाव), हर्षल सुरेश पाटील (जळगाव), सचिन संजय पाटील (जळगाव), यश तुषार पाटील (जळगाव) यांना परीक्षेतील यशाबद्दल सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता पाटील यांनी केले. प्रास्ताविक नोबेल फाउंडेशनचे संचालक जयदीप पाटील यांनी केले,तर आभार स्वयंभीर प्रतिष्ठानचे संदीप पाटील यांनी मांडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमरसिंग राजपूत,देवलसिंह पाटील,राजेंद्र पाटील,दिलीप बोरसे, दीपक ठाकरे यांनी परिश्रम घेतले.