⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

मग आता ढुंगणाला पाय लावून का पळाला ; गुलाबरावांवर संजय राऊतांची सडकून टीका

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जून २०२२ । शिवसेना आमदारांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकारवर संकटाचे ढग दाटून आले आहेत. एकीकडे शिवसेना बंडखोरांना कठोरपणे सामोरे जाण्याचा संदेश देत आहे तर दुसरीकडे आमदारांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेने स्थानिक पातळीवर शिवसैनिकांचे मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. दहिसर येथील शिवसेनेच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना शिवसेना नेते खा.संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गुलाबराव पाटील (Gulabrao patil) यांच्यावर सडकून टीका केली आहे. गुलाबराव पाटील पानटपरी चालवायचा. आता ढुंगणाला पाय लावून पळाला, आता पुन्हा त्याला पानटपरी चालवायला पाठवा अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

तसेच संदिपान भुमरे यांच्यावरही त्यांनी यावेळी हल्लाबोल केला. हा संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) पैठणच्या साखर कारखान्यात वॉचमन होता. मोरेश्वर सावेंचे तिकीट कापून त्याला बाळासाहेब ठाकरे यांनी तिकीट दिले, की हा साधा शिवसैनिक आहे, मात्र यांनी दगा दिला असे संजय राऊत म्हणाले.

गुलाबराव पाटील आणि संदिपान भुमरे यांच्यावर टीका करताना पुढे ते म्हणाले, की गुलाबराव पाटील आणि संदिपान भुमरे यांच्यासारखे कातडे वाघाचे आणि काळीज उंदराचे असे आम्ही नाही. आमचे काळीजही वाघाचे आहे. गुलाबराव पाटील मोठमोठ्या बाता मारत होता, मी सच्चा शिवसैनिक आहे, मला कॅबिनेट मंत्री केले. मग आता का पळाला ढुंगणाला पाय लावून, असा हल्लाबोल त्यांनी केला. हे महाभारतातील संजयचे वक्तव्य आहे, ज्याने तीस वर्ष बाळासाहेबांच्या पायाशी बसून काम केले आहे. माझा शब्द कधी खोटा ठरत नाही, असे ते म्हणाले. तर संदिपान भुमरे यांच्यावरही त्यांनी यावेळी टीका केली.