सर्जनशील लेखकाचं जाणे दुःखदायक – भालचंद्र नेमाडे
जळगाव लाईव्ह न्यूज | ४ सप्टेंबर २०२१। मराठीच नव्हे तर भारतीय नाट्यसृष्टीतील महत्वाचे नाटककार, लेखक म्हणून ओळखले जाणारे जयंत पवार यांच्या निधनाने आपण एका उत्तम व संवेदनशील लेखकाला गमावले आहे. भूमिका घेणारा लेखक अशी देशपातळीवर ओळख असलेले पवार राजकीय व सामाजिक मुद्दयांवर प्रभावीपणे व्यक्त होत, त्यांनी कधीही बोटचेपी भूमिका न घेता निर्भीड होत लेखकाने व्यक्त व्हावे हा आदर्श घालून दिला असल्याचे मत “श्रध्दांजली : एका थोर नाटककाराला” या परिवर्तन आयोजित श्रद्धांजली सभेत मान्यवर वक्त्यांनी मांडले. यात ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त पद्मश्री डॉ भालचंद्र नेमाडे, हिंदी भाषेतील जेष्ठ कादंबरीकार व कथालेखक उदय प्रकाश, जेष्ठ कादंबरीकार रंगनाथ पठारे, जेष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे, जेष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष, कवी श्रीकांत देशमुख, अभिनेते संजय नार्वेकर, रंगकर्मी शंभू पाटील, नंदू माधव यात सहभागी झाले होते.
याप्रसंगी भालचंद्र नेमाडे यांनी आपल्या आतल्या घुसमटीला जीवनानुभवाला शब्दरूप देत त्याला रंगभूमी व कथेच्या माध्यमातून आपली अभिव्यक्ती करणारा हा लेखक म्हणजे आपल्या जगण्याला शब्दरूपात मांडणारा हा महत्वाचा लेखक होता. आपल्या कालखंडाला थेट भिडत त्याला सृजनशील रुपात मांडून हा काळाच्या चौकटी पलीकडे जाणारा लेखक होता, असं भालचंद्र नेमाडे यांनी सांगितलं . जयंत पवार यांचा संपूर्ण नाट्यसृष्टीला धाक होता, चुकीचं नाटक केलं तर जयंत काय म्हणेल ह्याची भीती होती. इतकी आदराची भावना सगळ्याच रंगकर्मी मध्ये होती. अशी भवना सुप्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे यांनी मांडली. जयंत पवार हे गावागावात नाटक करणाऱ्या महाराष्ट्रातील हौशी नाटक वाल्यां साठी अतिशय महत्वाच नाव आहे. ‘चौथी भिंत’ या सदरामुळे एक दिशा रंगभूमीला मिळाली आहे. नाट्यलेखक म्हणून त्यांच नाटक हे मराठी रंगभूमीला पुढे नेणार होत . रेपटाईल कॉम्प्लेक्स ह्या संकल्पनेच्या आधारे त्यांनी लिहलेल ‘काय डेंजर वारा सुटला आहे’, हे महत्त्वाचं नाटक त्यांनी लिहलं आहे, अस शंभू पाटील यांनी म्हंटलं. याप्रसंगी ज्योती सुभाष म्हणाल्या की, अंधातर ह्या नाटकामुळे जयंतच्या नाटकातुन मला काम करायला मिळालं . माझं बालपण राष्ट्र सेवादलात गेलं म्हणून मला जयंतच नाटक मला आपलं वाटत आलं आहे . नवल वाटावं अस नाटक लिहणारा हा नाटककार मला थोर नाटककार वाटतो अस जेष्ठ रंगकर्मी ज्योती सुभाष म्हणाल्या.
अभिनेते संजय नार्वेकर म्हणाले की, जयंत पवार यांच जाणं हे मराठी रंगभूमीच मोठं नुकसान आहे . नाटक कोणतं बघावं ,कस बघावं याच प्रशिक्षण महाराष्ट्रातील रसिकांना देणारा समीक्षक आपल्या मधून निघून गेला आहे . आम्ही केलेल्या अनेक चळवळीना पाठींबा देणारा स्नेही आज आपल्यात नाही . हेच आमच नुकसान आहे अशी भावना अभिनेते संजय नार्वेकर यांनी व्यक्त केली . कवी श्रीकांत देशमुख म्हणाले की, जयंत कधीच मरत नसतो तर जयंत पवार हे नेहमीच सोबत असतात . जयंत पवार यांच लेखन म्हणजे महर्षी शिंदे यांची परंपरा पुढे नेणारे आहे . जात , धर्म या पलीकडे जात माणूसपण जपणारा हा लेखक आपला एक अमीट ठसा मराठी साहित्यावर सोडून गेला आहे . आपला हा मित्र जाणं म्हणजे आपला अवयव नाहीसा होणं आहे . अशी भावनिक मांडणी कवी श्रीकांत देशमुख यांनी केली.
सुप्रसिद्ध हिंदी साहित्यिक उदय प्रकाश मनोगतात म्हणाले की, जयंत पवार हे केवळ मराठी प्रांताचे लेखक नव्हते तर ते आमच्या प्रांतात सुद्धा माहिती असलेले महत्वाचे लेखक होते. आता उत्तर राजकीय कालखंडात समकालीन काळाला आपल्या लेखणी मधून पकडणारा हा लेखक मराठी मधील नेमाडे , पठारे , काळसेकर या महान लेखकच्या पंक्तीमधील लेखक जयंत पवार यांच जाणं खूपच अस्वस्थ करणार आहे . असं मत त्यांनी व्यक्त केले.
सुप्रसिद्ध कादंबरीकार रंगनाथ पठारे म्हणाले की, गिरणगावात वाढलेला जयंत संपूर्ण महाराष्ट्रातील सगळ्यांचा झाला . याच कारण या गिरणगावात सगळा महाराष्ट्रच होता . या मुळेच त्याला महाराष्ट्र कळला . मुंबई मधल्या इतर प्रांताच्या भाषेचा परिणाम झालेली मराठी आपल्या लेखनात आणून एक व्यापक अनुभव देणारा हा सर्वकालीन थोर लेखक आहे . जीवनाचे अनेक स्तरिय दर्शन घडवणारा हा लेखक म्हणूनच मोठा आहे.
भूमिका घेणारा लेखक जयंत आज आपल्यात नाही हे दुःखद आहे अशी भूमिका रंगनाथ पठारे यांनी मांडली. याप्रसंगी जेष्ठ अभिनेते नंदु माधव म्हणाले की, जयंत पवार यांच्या सारखा नाटककार मराठीत होता , त्यांचं नाटक हे जागतिक दर्जाचे होते पण आपण त्यांच्या मधील नाटककाराला ओळखलं नाही .हे आपल्या मराठी रंगभूमीच नुकसान आहे . साधेपणा व नम्रता हे असून पक्की भूमिका मांडणारा हा नाटककार कायम स्मरणात राहील अस नंदू माधव म्हणाले.