बुधवार, नोव्हेंबर 29, 2023

साबीर लंगड्याने रेल्वेत चोरले साडेपाच लाखांचे दागिने, भुसावळ पोलिसांनी सुरतला पकडले

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ नोव्हेंबर २०२१ । रेल्वेने सुरत ते रायपूर असा प्रवास करीत असलेल्या प्रवाशी महिलेच्या बॅगेतून ५ लाख ६३ हजारांचे दागिने चोरी केल्याचा प्रकार पहाटे दि.२२ रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास जळगाव ते भुसावळ दरम्यान घडला होता. भुसावळ रेल्वे पोलीस पथकाने शिताफीने तपास करून सराईत दिव्यांग गुन्हेगार साबीर लंगडा याला २४ तासाच्या आत सुरत येथून अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सुरत येथील गीताबेन योगेश पटेल वय-३८ या दि.२१ रोजी अहमदाबाद – पुरी एक्सप्रेसने सुरतहून रायपूर जात होत्या. त्या झोपेत असताना जळगाव ते भुसावळ दरम्यान पहाटे ४.२० ते ४.४५ वाजेच्या सुमारास चोरट्याने त्यांच्या डोक्याखाली ठेवलेली पर्स चोरून नेली. या पर्समध्ये सोन्याचे मंगळसूत्र, हार, २ चैन, एक रिंग, अंगठी, मोबाईल आणि रोख १ हजार असा ५ लाख ६२ हजारांचा मुद्देमाल होता. चोरट्याने रेल्वेच्या बाथरूममध्ये बॅग घेऊन जात माल काढून घेतला.

गीताबेन यांना जाग आल्यावर त्यांनी बडनेरा रेल्वे पोलीस ठाण्यात नोंदवलेला गुन्हा शून्य क्रमांकाने भुसावळ रेल्वे पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला होता. भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी लागलीच तपासचक्रे फिरवीत भुसावळ रेल्वे स्थानकावर या गाडीतून उतरलेल्या प्रवाशांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक दिव्यांग व्यक्ती संशयास्पदरित्या फिरताना दिसून आला. अधिक माहिती काढली असता तो ज्या रिक्षाने गेला त्या चालकाची माहिती पोलिसांनी काढली. पोलीसांनी माहिती मिळवल्यावर तो भुसावळात कन्हैया कुंज हॉटेलमध्ये थांबला असल्याचे समजले. तेथे त्याचे नाव साबीर लंगडा असून तो सराईत गुन्हेगार असल्याचे व सुरतचा रहिवाशी असल्याचे स्पष्ट झाले.

सुरत येथून आवळल्या मुसक्या
भुसावळ रेल्वे पोलिसांचे पथक लागलीच सुरतला गेले. साबीर लंगडा याचा शोध घेतल्यावर त्याला सापळा रचून अटक करण्यात आली. त्याचे मूळ नाव अब्दुल साबीर रहेमान शेख (वय-३०) रा. विंग नं.९, बी ब्लॉक, वेस्टन आवास, सचिन रोड, सुरत येथील तो रहिवाशी आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरलेला ५ लाख ६२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पोलीस अधिक्षकांनी दिले ५ हजारांचे बक्षीस
अवघ्या २४ तासात गुन्हा उघड करण्याची कामगिरी भुसावळ रेल्वे पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय येरडे, राधाकृष्ण मीना, गुप्त वार्ता विभागाचे निरीक्षक सुरेश थोरात, उपनिरीक्षक संजय साळुंखे, हवालदार ठाकूर, घुले, खंदारे, आरपीएफचे भूषण पाटील, कैलास बोडके यांच्या पथकाने पार पाडली आहे. औरंगाबादच्या लोहमार्ग पोलीस विभागाच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी या पथकाला या कामगिरीबद्दल ५ हजार रुपयांचे बक्षीस दिले आहे.