RBI कडून महाराष्ट्रातील ‘या’ बँकेचा परवाना रद्द ; लोकांच्या ठेवी अडकल्या, यात तुमचं तर नाही खाते?
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२२ । भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) आणखी एका बँकेचा परवाना रद्द केला आहे. रुपी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पुणे असे या परवाना रद्द केलेल्या बँकेचे नाव असून आता ही बँक सामान्य व्यवहार करू शकणार नाही. आता या बँकेत पैसे जमाही करता येणार नाहीत आणि कोणताही खातेदार पैसे काढू शकणार नाही.
मुंबई उच्च न्यायालयाच्या दिनांक 12 सप्टेंबर 2017 च्या आदेशाचे पालन करून RBI ने आता रुपी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पुणेचा परवाना रद्द केला आहे. RBI चा हा आदेश 6 आठवड्यांनंतर (22 सप्टेंबर 2022) लागू होईल. रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेला बँकिंग व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी दिल्यास ते सार्वजनिक हिताचे ठरणार नाही, असे आरबीआयने म्हटले आहे. या बँकेची सध्याची आर्थिक स्थिती चांगली नाही. सध्या ही बँक आपल्या खातेदारांना संपूर्ण रक्कम परत करण्याच्या स्थितीत नाही.
ही बँक 6 आठवड्यांनंतर बंद होईल
RBI ने म्हटले आहे की रुपी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आजपासून 6 आठवड्यांनंतर आपला बँकिंग व्यवसाय बंद करेल. या बँकेला बँकिंग व्यवसायावर बंदी घालण्यात येणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. बंदी लागू झाल्यानंतर बँक ग्राहकांकडून पैसे जमा करू शकणार नाही किंवा त्यांना पैसे देऊ शकणार नाही.
आरबीआयच्या म्हणण्यानुसार, त्यांनी महाराष्ट्रातील सहकार आयुक्त आणि सहकारी संस्थांच्या निबंधकांना रुपी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बंद करण्यास आणि बँकेसाठी लिक्विडेटर नियुक्त करण्यास सांगितले आहे. बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची क्षमता नाही.
रुपी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड प्रथम बंद होईल. यानंतर खातेदारांचे दावे मागवले जातील. हे दावे नंतर ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) अंतर्गत निकाली काढले जातील. या अंतर्गत या बँकेत जमा केलेले 5 लाख रुपयांपर्यंत सर्वांना परत केले जाईल. या रकमेत मुद्दल आणि व्याजाचा समावेश असेल. जर जमा केलेले पैसे 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असतील तर ते बुडण्याची खात्री आहे.