जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२५ । दिशा सालियान मुद्द्यावरून विधिमंडळात भाजपच्या आमदार चित्रा वाघ आणि ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब यांच्यात जोरदार शाब्दिक द्वंद रंगलं होतं. त्यावेळी चित्रा वाघ यांनी, परब यांना मी तुमच्या सारखे 56 पायाला बांधून फिरते, असं म्हंटलं होतं. त्यावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला जात असून यातच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी आमदार चित्रा वाघ यांना सुनावले.

रोहिणी खडसे यांनी चित्रा वाघ यांच्यावर ‘बिग बॉस’ रिएलिटी शो चा संदर्भ देऊन टीका केली. “एका वरिष्ठ सभागृहामध्ये एक महिला एका लोकप्रतिनिधी बाबत असं वक्तव्य करते. त्या सभागृहाची एक गरिमा आहे. त्या गरिमेच्या हिशोबाने तिथे वक्तव्य करणं अपेक्षित आहे” असं रोहिणी खडसे म्हणाल्या.
रोहिणी खडसे यांनी ट्विटवर आपली प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, तुम्ही ज्या पक्षाकडून विधान परिषदेच्या सदस्या झाला आहात त्या पक्षाला शून्यातून एका वटवृक्षात रुपांतर करण्यात, वाढवण्यात ज्या ठराविक लोकांची नावे घेतली जातात, त्यात माझ्या वडिलांचे नाव अग्रक्रमाने येते. चार पक्ष फिरून येऊन तुम्ही आरामात ज्या पक्षाच्या विधान परिषदेची जागा मिळवलीय ना आणि भाजपसारख्या भल्या मोठ्या वटवृक्षाच्या सावलीत आरामात बसलात ना, त्यात माझ्या वडिलांचे कष्ट आहेत.
विचारा तुमच्या वरिष्ठांना… शेतकरी, दुर्लक्षित घटक, ओबीसी बांधव आणि शेवटच्या घटकापर्यंतच्या माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न करत ते इथवर आलेले आहेत आणि लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रवास आजतागायत सुरूच आहे. यात कधी त्यांनी आकांडतांडव करून प्रसिद्धी मिळवली नाही! त्यामुळे आपण कुणाबाबत बोलतो हे लक्षात घेऊन बोला.. उगाचच उचलली जीभ लावली टाळ्याला नको…. असं रोहिणी खडसेंनी ट्विट केलं आहे.