⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

खडके आश्रमशाळेतील मुलींना न्याय मिळत नसेल तर.. रोहिणी खडसेंची जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यावर टीका

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ डिसेंबर २०२३ । जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील खडके येथील आश्रमशाळेमधील अल्पवयीन मुली तसेच मुलांवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या घटनेप्रकरणी बालकल्याण समितीच्या सदस्यांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गुन्हा दाखल होवून चार महिने उलटले तरी बालकल्याण समिती बरखास्त करण्यात आलेली नसून त्यांच्यावर निलंबन अथवा कुठलीही कारवाई करण्यात होत नसल्याने या प्रकाराबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन जळगाव जिल्ह्यातील तिनही मंत्री आणि प्रशासनावर टीका केली आहे

जळगाव जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे तसेच मंत्र्यांचा वरदस्त असल्यामुळे कारवाई करण्यात येत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी केला आहे.

अत्याचाराबाबत संबंधित अल्पवयीन मुलींनी बालकल्याण समितीच्या सदस्यांकडे तक्रार केली होती. मात्र त्यानंतरही तब्बल चार महिन्यापर्यंत अल्पवयीन मुली तसेच मुलांवर अत्याचार करण्यात आले. मात्र बालकल्याण समिती सदस्यांनी गांभीर्याने घेतलं नाही. शासनाने नियुक्त केलेल्या पाच सदस्यीय समितीने शासनाला या प्रकरणाचा अहवाल सादर केला असून बालकल्याण समितीच्या सदस्यांवर ठपका ठेवला आहे, असे असतानाही कारवाई होत नसल्याची माहिती रोहिणी खडसे खेवलकर यांनी दिली आहे.

मुलींना न्याय मिळावा एकनाथ खडसे , यांच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनात विषय मांडणार आहे. असेही रोहिणी खडसे यांनी स्पष्ट केलं आहे. यावेळी त्यांनी तीन-तीन मंत्री असताना जर मुलींना न्याय मिळत तर हे मंत्री काय कामाचे असा सवाल मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील आणि अनिल पाटील यांचे नाव न घेता केला आहे.