जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑक्टोबर २०२१ ।अमळनेर तालुक्यातील गांधली येथे आठ ते दहा दरोडेखोरांनी एका शेतातील शेडवर दरोडा टाकून तब्बल ६३ बकऱ्या लांबविल्याची घटना रविवार दि.१७ रोजी मध्यरात्री १.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील पशुपालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अमळनेर तालुक्यातील जळोद रस्त्यावरील गट नंबर २०६ मध्ये जालंदरनाथ सुरेश चौधरी (रा. गांधली, ता.अमळनेर) यांच्या मालकीचे बकऱ्यांचे शेड आहे. या शेडच्या रखवालीसाठी सोमा भास्कर मोरे यांना ठेवण्यात आले आहे. रविवार दि.१७ रोजी मध्यरात्री १.३० वाजेच्या सुमारास आठ ते दहा जणांची टोळी तोंडाला रुमाल बांधून या ठिकाणी आली, त्यांनी सोमा मोरे आणि त्यांच्या पत्नीला पावरी भाषेत दमदाटी करून त्यांच्याजवळील मोबाइल हिसकावून घेत त्यातील सिम कार्ड काढून घेतले. त्यानंतर त्यांना ‘तुम्ही खोलीतच थांबा, आरडाओरडा केल्यास तुम्हाला मारून टाकू’, अशी धमकी देऊन खोलीचा दरवाजा बाहेरून लावून घेतला. त्यानंतर त्यांनी बकऱ्यांच्या शेडचे गेट तोडून २ लाख ६३ हजार रुपये किमतीच्या ६३ बकऱ्या चोरून नेल्या.
दरवाजा वाकवून मुलाला काढले बाहेर
दरम्यान, सोमा मोरे यांनी दरवाजा वाकवून मुलाला बाहेर काढले. त्यानंतर त्याने दरवाजा उघडला. पहाटे ५ वाजता सोमा मोरे यांनी दुसऱ्याच्या मोबाइलवरून मालक चाैधरी यांना फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली. जालंदरनाथ चाैधरी यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, उपनिरीक्षक शत्रुघ्न पाटील, हेड कॉन्स्टेबल किशोर पाटील, अमोल पाटील, पोलिस नाईक शरद पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. जालंदरनाथ चाैधरी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शत्रुघ्न पाटील करीत आहेत.
जळोद रस्तावर लावली चारचाकी?
बकऱ्याचे हे शेड मुख्य रस्त्यापासून एक किलाेमीटर आत पूर्वेला आहे. तेथे गाडरस्ता असल्याने या ठिकाणी चारचाकी वाहन जाऊ शकत नाही. त्यामुळे चोरट्यांनी चारचाकी जळोद रस्त्यावर उभी केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील पशूपालकांची चिंता वाढली असून रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी पशुपालकांकडून होत आहे.