जळगाव लाईव्ह न्यूज | 28 जानेवारी 2024 | जळगाव शहरातील रस्त्याच्या कामासाठी राज्य शासनाने शंभर कोटी रूपये मंजूर केले आहेत. शहरातील प्रभाग क्रमांक १ ते १७ मधील रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणाच्या या कामांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे जळगाव शहरातील रस्ते आता चकाचक होणार आहेत.
नगर विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार महानगरपालिका क्षेत्रात नागरी सेवा व सुविधेची कामे या योजनेत जळगांव महानगरपालिकेच्या अंतर्गत रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणाच्या कामांसाठी राज्य शासनाने शंभर कोटींचा निधी मंजूर केला आहे. निधीचा विनियोग करणारी कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव काम पाहणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामांना तांत्रिक मान्यता दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरविकास विभागाने या कामांना प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला होता. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रस्तावास तात्काळ प्रशासकीय मान्यता दिली आहे. आता याबाबतच्या कामांचे कार्यारंभ आदेश निर्गमित केले जाणार आहेत. प्रभाग क्रमांक १ ते १९ मधील रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणाची एकूण ४१ कामांना मंजूरी देण्यात आली आहे. या कामांमुळे जळगाव शहरातील अंतर्गत रस्ते चकाचक होणार आहेत.