⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

रिमझिम पावसामुळे केळीवर पिटिंग व करपाचा धोका ; केळीतज्ज्ञांची माहिती

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२३ । राज्यात मागील अनेक दिवसापासून पावसाने दडी मारली आहे. मात्र जळगाव जिल्ह्यात अधूनमधून पावसाची रिपरिप सुरु आहे. यामुळे खरिपाच्या पिकांना आधार मिळत आहे. मात्र दुसरीकडे या रिमझिम पावसामुळे पिटिंग (काळे ठिपके) व करपा रोगाच्या प्रादुर्भावासाठी वातावरण पोषक आहे. केळी बागांवर पिटिंगचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, असे जैन उद्योग समूहाचे उपाध्यक्ष व केळीतज्ज्ञ डॉ. के. बी. पाटील यांनी सांगितले आहे.

पहूर (ता. जामनेर) येथील भेटीत त्यांनी केळी उत्पादक शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी केळीवर पिटिंग व करपाचा धोका ओळखून बागा वाचवण्यासाठी सतर्क राहावे, असे आवाहन केले. यावेळी जैन उद्योग समूहाचे केळी पीक सल्लागार तुषार पाटील, योगेश पाटील, विकास पाटील, प्रकाश पाटील, अरुण पाटील, गजानन पाटील, सुनील पाटील यांच्यासह केळी उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

पिटिंग म्हणजे काय?
पिटिंगमध्ये केळीचे घड व दांड्यावर काळे डाग दिसून येतात. असे असेल तर ती पिटिंगच्या प्रादुर्भावाची लक्षणे म्हणता येतील. या रोगासाठी रिमझिम पाऊस व ढगाळ वातावरण पोषक आहे. या रोगापासून पिकांना वाचवण्यासाठी केळी बागेतील सडलेली व वाळलेली पाने नष्ट करून बागा स्वच्छ ठेवाव्यात, असा सल्ला डॉ. के. बी. पाटील यांनी दिला.

जळगाव तालुक्यातील किनोद व आसोदा गावात प्रथम सन २०१३ मध्ये पिटिंग रोगाचा प्रादुर्भाव उघडकीस आला होता. या रोगामुळे केळी बागांची व घडांची गुणवत्ता व दर्जा धोक्यात येत आहे.