जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑगस्ट २०२३ । जळगाव शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या अपघाताचे प्रमाण वाढत असून अशातच आणखी एका अपघाताची बातमी समोर आलीय. शहरापासून नजीक असलेल्या उमाळा बस स्टॉपनजीक भरधाव वेगाने येणाऱ्या एका चारचाकी वाहनाने प्रवासी रिक्षास जबर धडक दिली. यात रिक्षा चालकाचा मृत्यू झाला असून प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे. राजू ओमप्रकाश साहू (वय ४५) असं मृताचे नाव असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात अनोळखी चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी काय आहे घटना?
जळगाव शहरापासून काही अंतरावर असलेल्या उमाळा गावाच्या बस स्थानकानजीक दिनांक १६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी क्रमांक एम.एच.०२.बी.आर.४३९१ या चारचाकीने प्रवासी रिक्षा एम.एच.१९.व्ही.३७६८ ला जोरदार धडक दिली.
या अपघातात रिक्षाचालक राजू साहू यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून रिक्षात असलेले प्रवासी यांना दुखापत झाली असून ते रुग्णालयात उपचार घेत आहे. हा अपघात इतका भीषण होता कि रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी अनोळखी चारचाकी चालका विरोधात हरीश साहू यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिस शेख हे करीत आहे.