जळगाव लाईव्ह न्यूज । एकीकडे विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना खान्देशातील धुळे शहरात शिवसेना ठाकरे गटात मोठा भूकंप झाला. धुळ्यात ठाकरे गटाच्या तब्बल ५२ पदाधिकाऱ्यांनी एकाच वेळी राजीनामे देत भारतीय जनता पक्षाला (भाजप) पाठिंबा दर्शविला आहे.
ठाकरे एकीकडे प्रचारात व्यस्त असतानाच शिवसेनेत मोठा भूकंप झालाय. त्या ५२ जणांनी भाजपचे उमेदवार अनुप अग्रवाल यांना पाठिंबा दिला आहे. या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे गटाच्या नेतृत्वाविरुद्ध असंतोष व्यक्त करताना भाजपला पाठींबा दिला.
खरंतर माजी आमदार अनिल गोटे यांना परस्पर उमेदवारी दिल्याने हे सर्व शिवसेना पदाधिकारी नाराज होते. गोटे यांनी अनेकवेळा शिवसेना पक्षावर जहरी टीका केल्यानंतर ठाकरे यांनी शिवसेनेची उमेदवारी दिल्याने पदाधिकारी नाराज झाले. शिवसेना ठाकरे गटाला धुळ्यात हा जबर धक्का मानला जात आहे. भाजपात प्रवेश न करता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप उमेदवार अनुप अग्रवाल यांचा प्रचार करणार असल्याचे यावेळी नाराज पदाधिकारी महेश मिस्त्री यांनी स्पष्ट केले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे हे पदाधिकारी विविध पातळीवर कार्यरत होते. त्यांच्या राजीनाम्यामुळे पक्षाच्या स्थानिक संरचनेला मोठा फटका बसला आहे. एका पदाधिकाऱ्याने सांगितले, “आम्ही पक्षाच्या निर्णयांशी सहमत नसल्याने राजीनामे दिले आहेत. भाजपमध्ये आम्हाला अधिक स्वातंत्र्य आणि कार्य करण्याची संधी दिली जाईल असे वाटते.” या घटनेचे परिणाम निवडणुकीच्या निकालावर दिसून येण्याची शक्यता आहे.