⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

भाजपच्या आणखी 200 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे ; रावेर लोकसभा मतदारसंघात खळबळ

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२४ । भाजपने रावेर लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार रक्षा खडसेंना उमेदवारी जाहीर केल्यानंतर रावेर लोकसभेतील भाजपच्या काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून रक्षा खडसेंच्या उमेदवारीला विरोध केला असून अनेकांनी राजीनामे दिले. यातच आता आणखी दोनशे पदाधिकार्‍यांनी सामूहिक राजीनामे दिल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कार्यकर्त्यांनी त्यांचे राजीनामे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठवले आहेत.

भाजपने देशात अनेक ठिकाणी विद्यमान खासदारांचे तिकिट कापले आहे. बहुतांश खासदारांचा पत्ता कट करण्यात आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. रावेरमधून विद्यमान रक्षा खडसेंचं तिकीट कापलं जाणार असल्याची चर्चा होती. मात्र भाजपने रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिल्याने रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज झाले आहेत. पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपली नाराजी उघड व्यक्त करत राजीनामेही दिले आहेत.

रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने सुरू झालेले राजीनाम्याचे सत्र आता भुसावळ तालुक्यात वरणगाव शहर, परिसरात पोहोचले आहे. वरणगाव येथील पदाधिकारी व कार्यकर्ते बूथ प्रमुख व सुपर वॉरियर असे मिळून 200 जणांनी आपल्या पदाचे राजीनामा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष आमोल जावळे यांच्याकडे पाठवल्याने रावेर लोकसभा मतदारसंघात खळबळ उडाली आहे. बोदवड, मुक्ताईनगर, यावल, रावेर, चोपडा, भुसावळ व इतर तालुक्यांमध्ये रक्षा खडसे यांच्या उमेदवारीला भाजपमधून तीव्र विरोध होत आहे.