जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२१ । कोरोना लॉकडाऊनमुळे अनेक जण बेरोजगार झाले आहेत तर अनेकांनी शेतीचा रस्ता धरला. त्यात देखील सातत्याने होत असलेल्या दुष्काळाला तोंड देत आहे. अशा परिस्थिती मुक्ताईनगर तालुक्यातील तालखेडा येथील एका शेतकऱ्याने दुष्काळावर मात करत डाळिंबाचे विक्रमी उत्पादन घेतलं आहे.
नवनीत दत्तात्रय पाटील आणि दिलीप दत्तात्रय पाटील अशी या शेतकऱ्यांची नावं आहेत. शेतकऱ्यांच्या कुटुंबांनी सर्व सदस्यांनी एकत्र त्यांच्या प्रयत्नांना साथ दिल्यानं त्यांनी 7 एकर शेतात डाळिंबाचं 900 किंटल उत्पन्न घेतलं आहे. पाटील बंधूंना डाळिंबाच्या शेतीतून पन्नास लाखांचं विक्रमी उत्पन्न मिळालं आहे. दरम्यान, नवनीत पाटील आणि दिलीप पाटील यांनी एकत्रित येत केलेल्या शेतीमुळे इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श उभा राहिला आहे. पाटील यांच्या शेतातील डाळिंब आता बांग्लादेशला देखील निर्यात केली जाणार आहेत. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या सहकार्यानं हे शक्य झाल्याचं पाटील बंधू सांगतात.
मुक्ताईनगर तालुक्यातील डाळिंब आता थेट बांगलादेशात जाणार आहेत. पंढरपूर येथील व्यापाऱ्याच्या माध्यमातून जाणार असल्याची माहितीदेखील नवनीत पाटील यांनी दिली. आपण नियोजन योग्यरीत्या केले तर शेतात काही उत्पन्न घेऊ शकतो. फळ बागायत वाढल्यामुळे हालाखीच्या परिस्थितीवर मात केली असल्याचं पाटील यांनी सांगितलं. पाटील यांच्या शेतीचा विस्तार आता शंभर एकरापर्यंत पोहोचला आहे.
नवनीत पाटील आणि दिलीप पाटील यांच्या शेतात तालखेडा गावातील आणि मुक्ताईनगरच्या ग्रामीण भागातील 40 ते 50 मजूर देखील त्यांच्या शेतात रोज कामाला आहेत. पाटील बंधूंनी डाळिंब बागायत आणि इतर शेतीच्या कामाच्या माध्यमातून इतरांना रोजगार देखील उपलब्ध करुन दिला आहे.