⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

..म्हणून सावत्र बापाने चिमुकलीला ठार मारलं ; खुनामागील धक्कादायक कारण समोर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२४ । रावेरमधून एक मनसुन्न करणारी एक घटना समोर आली आहे. सावत्र बापाने तीन वर्षाची मुलगी आकांक्षा हिचा गळा आवळून खून केला आहे. धक्कादायक म्हणजेच आईला आकांक्षाच्या मृत्यूबद्दल समजताच तिने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मुलीची सख्खी आई व सावत्र बापाला अटक केली आहे. आता या खुनामागील कारणही समोर आले आहे. वैवाहिक संसारामध्ये दोन्ही मुले अडसर ठरत असल्यामुळे त्यांना सावत्र बापाने ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र यात मुलगा बचावला तर चिमुरडीला मात्र प्राण गमवावे लागले अशी माहिती आता समोर आली आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी रहिवासी माधुरीचा वारोली येथील भारत मसाने याच्याशी २०१७ मध्ये विवाह झाला होता. माधुरीला भारतपासून पाच वर्षाचा मुलगा पियुष व तीन वर्षाची मुलगी आकांक्षा आहे. मात्र पतीशी पटत नसल्याने माधुरी दोन्ही मुलासह बेलसवाडी येथे राहत होती. त्यानंतर माधुरीने रावेर येथील अजय घेटे याच्याशी काही दिवसापूर्वी दुसरे लग्न केले होते. तेव्हापासून ही दोन्ही मुले रावेर येथे अजयकडे राहत होती.

मात्र काही दिवसातच अजय घेटे याला माधुरीच्या मुलांचा तिरस्कार व्हायला लागला. माधुरी सोबतच्या वैवाहिक संसारामध्ये अडसर ठरत असलेल्या पियुष व आकांक्षा या दोन्ही लहान मुलांना अजय घेटे हा मारहाण करत असे. त्यांना रात्री घराबाहेर झोपवत असे. त्यांचा अजयने छळ चालवला होता, अशी माहिती लहानग्या पियुषने त्याचे वडील भारत म्हसाने यांच्याकडे दिली आहे.

दि. ३१ मे रोजी सकाळी ९ वाजेपूर्वी अजयने माधुरी हिच्या दोन्ही मुलांना मारहाण करायला सुरुवात केली. यात मुलगा पियुष हा जीव वाचवत घराच्या बाहेर पळत सुटला. पण तीन वर्षाची आकांक्षा ही मात्र अजयच्या तावडीत सापडली. लाकडी दांडक्याने त्याने तिला मारहाण केली. तसेच हातापायांवर भीषण मारहाण करून गळा आवळला यामध्ये आकांक्षा मात्र मयत झाली.

धक्कादायक म्हणजेच मृत मुलीच्या आईने गुन्हा लपविण्यासाठी मृतदेह बेलसवाडी नेऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु मुलीचा सख्खा बाप भारत म्हसाने याला समजल्यावर त्याने बेलसवाडी गाठले. त्याने मुलगा पियुष याला विचारणा केल्यावर “दुसऱ्या पप्पाने मारले” असे सांगितले. म्हसाने याला मुलीच्या गळ्याजवळ निशाण दिसून आल्याने त्याने अंतुर्ली पोलीस चौकीत मुलीला नेले. त्यानंतर रावेर पोलीस स्टेशन येथे भारत म्हसाने यांनी संशयित आरोपी अजय घेटे आणि पत्नी माधुरी म्हसाने-घेटे यांच्या विरोधात फिर्याद दिली. दरम्यान या धक्कादायक खुनामुळे रावेर शहर हादरले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ हे घटनेचा तपास करीत आहे.