जळगाव लाईव्ह न्यूज । सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करण्यासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री जागोजागी पार्त्या होतात. मद्यप्राशन करून वाहन चालविणे, मारामारीचेही प्रकार घडतात. सध्या राज्यात सध्या आचारसंहिता असल्याने पोलिसांची तळीरामावर करडी नजर राहणार आहे ‘थर्टी फर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर शहरातील चौकाचौकांमध्ये पोलिसांचा ताफा राहणार असून ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ची कारवाई केली जाणार आहे. तसेच धिंगाणा घातला तर कोठडीची हवा खावी लागू शकते.

महापालिका निवडणुकांची आचारसंहिता असल्यानं ३१ डिसेंबर रोजी पोलिस, प्रशासनाच्यावतीने अधिक काळजी घेतली जात आहे. थर्टी फर्स्टच्या रोजी अनुचित प्रकार घडू नये म्हणून वाहतूक शाखेसह विविध पोलिस ठाण्यांतर्गत नाकाबंदी करण्यात येणार आहे. चालकाने मद्यपान केले आहे का, यासाठी त्यांची ब्रेथ अॅनालायझरने तपासणी केली जाणार आहे.

शहर व परिसरात ठिकठिकाणी करण्यात आलेल्या तपासणी करून मद्यपान करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई केली जाते. त्यात प्रत्येकी १० हजाराचा दंड केला जातो. शहरातील चौकाचौकांमध्ये पोलिसांकडून तपासणी केली जाते. त्यामुळे अनेक जण आता बायपासने जाण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे बायपास रस्त्यावरही पोलिसांचे लक्ष राहणार आहे.

जळगाव शहराच्या चारही कोपऱ्यांवर नाकाबंदी
३१ डिसेंबरला दरवर्षी आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक, छत्रपती संभाजीनगर महामार्ग, टॉवर चौक, अजिंठा चौफुली अशा वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांकडून तपासणी केली जाते. यंदाही शहराच्या चारही बाजूने नाकाबंद करीत मद्यपी वाहनधारकांवर कारवाई केली जाणार आहे.





