⁠ 
रविवार, मे 5, 2024

RBI चा कर्जदारांसाठी मोठा दिलासा ; आजच्या बैठकीत रेपो दराबाबत घेतला हा निर्णय

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जून २०२३ । महागाईने होरपळून निघणाऱ्या सर्वसामान्य जनतेसाठी दिलासा देणारी बातमी आहे. ती म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 43 व्या चलनविषयक धोरण आढावा बैठकीत रेपो रेटमध्ये बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजे अशा स्थितीत कर्जदारांच्या कर्जदाचा हफ्ता वाढणार नाही.

रेपो दर जुन्या पातळीवरच राहण्याची ही सलग दुसरी वेळ आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये झालेल्या एमपीसीच्या बैठकीत रेपो दर 6.5 टक्क्यांच्या पातळीवर कायम ठेवण्यात आला होता.

रेपो दर एका वर्षात अडीच टक्क्यांनी वाढला
चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत (MPC बैठकीत) घेतलेल्या निर्णयाबाबत माहिती देताना, RBI गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, सर्वसहमतीने रेपो दर 6.5 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. वाढत्या महागाई दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी RBI ने मे 2022 पासून रेपो दरात अडीच टक्क्यांनी वाढ केली आहे. गेल्या वर्षी 4 टक्के असलेला रेपो दर यावेळी 6.5 टक्के झाला आहे.

रेपो दर चार वर्षांच्या उच्चांकावर
रेपो दर सध्या गेल्या चार वर्षांच्या उच्च पातळीवर चालू आहे. वाढत्या महागाई दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने व्याजदरात वाढ केली. याचा परिणाम असा झाला की किरकोळ महागाई दर 18 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर 4.7 टक्क्यांवर आला आहे. यापूर्वी मार्चमध्ये तो 5.7 टक्क्यांच्या पातळीवर होता.

कोणाला दिलासा मिळणार?
बँकांकडून कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करण्याचा फायदा मिळणार आहे. सध्या बँकांकडून कोणत्याही प्रकारच्या कर्जावरील व्याजदरात वाढ होण्याची आशा नाही. जर आरबीआयने रेपो दरात वाढ केली तर त्याचा परिणाम ग्राहकांना दिलेल्या कर्जावर दिसून येईल.

रेपो दर म्हणजे काय?
RBI कडून बँकांना ज्या दराने कर्ज दिले जाते त्याला रेपो दर म्हणतात. रेपो रेट वाढल्याने बँकांना आरबीआयकडून महागड्या दराने कर्ज मिळेल. यामुळे गृहकर्ज, कार कर्ज आणि वैयक्तिक कर्ज इत्यादींचे व्याजदर वाढतील, ज्याचा थेट परिणाम तुमच्या EMI वर होईल.