जळगाव लाईव्ह न्यूज । ५ डिसेंबर २०२५ । आरबीआयने कर्जधारकांना मोठा दिलासा दिला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रेपो रेटमध्ये कपात केली आहे. 0.25 टक्क्यांनी रेपो दरात कपात झाली असून यामुळे गृहकर्ज, वाहन कर्जावरील व्याजदरातही मोठी कपात होणार आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखालील चलनविषयक धोरण समितीने (MPC) आज रेपो दराबाबतचा निर्णय जाहीर केला. RBI ने रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात करून तो ५.२५% केला. वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात १०० बेसिस पॉइंट्सने कपात झाली होती. त्यानंतर आता दोनवेळा रेपो रेट स्थिर होता. आता पुन्हा यामध्ये कपात केली आहे. रेपो रेटमुळे होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोन स्वस्त होणार आहे.

गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले की, सर्व MPC सदस्यांनी रेपो दर कपातीला एकमताने पाठिंबा दिला. समितीने संतुलन राखण्यासाठी पुढे “तटस्थ” धोरणात्मक भूमिका राखण्याचा निर्णय घेतला.

रेपो दर म्हणजे काय?
रेपो दर म्हणजे रिझर्व्ह बँक इतर बँकांना ज्या दराने कर्ज देते तो दर. जर रेपो दर वाढला तर रिझर्व्ह बँकेकडून मिळणारे कर्ज बँकांसाठी अधिक महाग होते. आता, जर बँकांना रिझर्व्ह बँकेकडून जास्त किमतीचे कर्ज मिळाले तर व्यक्तींना मिळणारी कर्जे देखील महाग होतील. यामुळे ग्राहकांवरचा भार वाढेल. यामुळे गृहकर्ज, कार कर्ज आणि वैयक्तिक कर्जे महाग होतात. महागाई नियंत्रित करण्यासाठी आणि बँकांसाठी तरलता वाढवण्यासाठी जेव्हा गरज असते तेव्हा रिझर्व्ह बँक रेपो दर वाढवते.









