पालकशाळेच्या कार्यक्रमात राजीव तांबे यांचे प्रतिपादन

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२५ । मुलांना बालपणी चित्रांच्या माध्यमातून व्यक्त होऊ दया. मुलांना वारंवार मुर्ख, बेअक्कल म्हणून, उपदेश करून मुल सुधारत नाही. ‘काय करू नको’ हे सांगू नका ‘काय कर’ हे सांगा. मुलांचा आत्मसन्मान न दुखावता त्यांच्यात बदल कसे करता येतील अशा सकारात्मक सुधारणा करा. आपले बोलणं मुलांच्या मनात खोलवर परिणाम करतं. मुलांशी बोलतांना विचारपूर्वक बोला. मुलानी चुक केली तर त्याची चूक त्याला दाखवू नका, तर काय बरोबर आहे हे त्याला हजार वेळा सांगा. चुकीतून कसं शिकायचं हे मुलाला शिकवा. मुलांच्या यशात आणि अपयशात सहभागी होणं हे पालकत्व आहे, असा सल्ला अभिनव शिक्षण पध्दतीतील तज्ञ राजीव तांबे यांनी आज पालकांना दिला.
रिफ्लेक्शन फाउंडेशन संचलित पालक शाळे अंतर्गत आज शहरातील गंधे सभागृहात आयोजित आनंदी पालकत्व या विषयावर पालक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. व्यासपीठावर पालक शाळेचे संचालक रत्नाकर पाटील, डॉ. वीणा महाजन उपस्थित होते.
प्रास्ताविकात रत्नाकर पाटील म्हणाले की , “मुलांच्या सर्वांगिण विकासात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पालकांचा समुह म्हणून पालक शाळा उपक्रम सुरु केला. प्रचंड गतिमान झालेल्या आजच्या युगात पालक शाळा ही आजची गरज झाली आहे. यातून सुजाण व प्रभावी पालक तयार व्हावा असा आमचा प्रयत्न आहे. ”
पालक संवाद कक्ष स्थापन
पालक शाळेचा पुढचा प्रवास सांगतांना पालक शाळेच्या डॉ. वीणा महाजन म्हणाल्या, ” मुलांच्या विविध समस्यांवर एकमेकांशी संवाद साधून त्यातून मार्गदर्शन करण्यासाठी पालक शाळेतर्फे पालक संवाद कक्ष स्थापन करण्यात आला आहे. यात पालक शाळेचे समुपदेशकही उपस्थित रहाणार आहेत. सर्व पालकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.”
सूत्रसंचालन: प्रिती झारे तर आभार प्रदर्शन महेश गोरडे यांनी केले. या प्रसंगी पालकशाळेचे श्वेता जैन, मकरंद डबीर, डॉ. अनंत पाटील, महेश गोरडे, ज्ञानेश्वर पाटील, माधुरी पुंडे, स्वप्नील कोल्हे,प्रिती झारे, निलेश चौधरी, क्षितीजा देशपांडे यांनी परिश्रम घेतले. भय्यासाहेब गंधे सभागृहात मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.