---Advertisement---
राजकारण जळगाव जिल्हा महाराष्ट्र

राज ठाकरेंचे पत्र.. कार्यकर्त्यांना कळवली ‘ही’ माहिती!

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२२ । गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे जोमाने पक्षबांधणीच्या तयारीला लागले आहे. शस्त्रक्रिया आटोपल्यावर राज पहिल्यांदाच जनतेच्या समोर जाहीर येणार होते. उद्या मनसेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता मात्र तो मेळावा पुढे ढकलण्यात आला आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलरवर एक पत्र पोस्ट करीत तातडीची सूचना म्हणून याची माहिती देण्यात आली आहे. पुढची तारीख, वेळ लवकरच कळविण्यात पत्रात म्हटले आहे.

Raj Thackeray Letter

राज्यात सुरु असणाऱ्या सततच्या पावासामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा पुढे ढकलण्यात आलाय. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच पत्र लिहून यासंदर्भातील माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना दिली आहे. सध्याची पावसाची स्थिती पाहता मी उद्या जो कार्यक्रम तुम्हाला सांगणार होतो तो सांगितला तरी तो प्रत्यक्षात आणता येणं फार अवघड आहे, असं राज यांनी पत्रात म्हटलंय.

---Advertisement---

राज ठाकरे यांनी लिहिलेले पत्र जसेच्या तसे…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी

सस्नेह जय महाराष्ट्र!
तुम्हाला जरा थोड्या तातडीनं कळवतो आहे.
आपण वास्तविक उद्या एक मेळावा आयोजित केला होता. ज्यात मला तुमच्याशी बोलायचं होतं आणि कामासंबंधी काही सूचना करायच्या होत्या. परंतु कालपासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी पावसानं थैमान घातलेलं दिसत आहे. जनजीवन तर विस्कळीत आहेच, परंतु अशा परिस्थितीत मी उद्या जो कार्यक्रम तुम्हा सर्वांना सांगणार होतो तो सांगितला तरी तो प्रत्यक्षात आणता येणं फार अवघड आहे.
अशा परिस्थितीत आपण उद्याचा मेळावा पुढे ढकलत आहोत. पुढची तारीख आणि वेळ लवकरच, थोडा पावसाचा अंदाज घेऊन, तुम्हा सर्वांना कळवली जाईलच.

दरम्यान, तुम्ही स्वतःची तर काळजी घ्याच परंतु अतिवृष्टीमुळे जिथे लोकांना त्रास होतो आहे तिथेही तुम्ही लोकांसाठी जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करा. मुख्यतः नदीकाठाला जिथे लोक रहात आहेत तिथल्या घरांमध्ये पाणी घुसण्याची शक्यता आहे. सांगली कोल्हापूरकडचा आत्ता-आत्ताचा पूर तुम्हाला आठवतोय ना? काही लोकांना तात्पुरत्या निवासात हलवायला लागू शकतं. तिथे अन्नधान्य, पिण्याचं शुध्द पाणी, अंथरूण-पांघरूण (सर्वत्र ओल असते) पुरवावं लागेल. मुख्यतः वृध्द, गरोदर महिला, अपंग आणि लहान मुलं ह्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. झाडं उन्मळून पडतात, ती नंतर पुन्हा लावावी लागतील. अशा खूप गोष्टी आहेत.

एक लक्षात घ्या की अशा परिस्थितीत सरकारी यंत्रणा प्रचंड कामात असतात. त्यामुळे त्यांच्यावर विनाकारण ताण येईल असं काहीही करू नका. अर्थात, असं काही होऊ नये, कुठलंही नैसर्गिक संकट येऊ नये, हीच आपली इच्छा आहे, फक्त सतर्कतेसाठी सांगितलं.

लवकरच भेटू,
आपला नम्र
राज ठाकरे

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---