जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२६ । राज्यातील २९ महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच नेते पायाला भिंगरी लावून प्रचार करत असून आज नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसेकडून आयोजित पहिल्याच प्रचारसभेतून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. नाशिक दत्तक घेतो म्हणाले… नंतर बाप फिरकलाच नाही असा हल्लाबोल राज ठाकरेंनी फडणवीसांवर केला आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपमध्ये जोरदार इनकमिंग झाले. यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, नाशिकमध्येही भाजप तुमच्याकडे माणसं होती ना. म्हणजे 52 साली जन्माला आलेला एक पक्ष जनसंघ नावाने त्याला 2026 ला पोरं भाड्याने घ्यावे लागतात. तुमची माणसं उभी केली होती ना. मग दुसऱ्यांची कशाला कडेवर घेऊन नाचत आहात. येणारे आनंदाने येत नाही. रात्री पैसे पोहोचवले जातात.

पुढे बोलताना राज ठाकरे यांनी, ‘तपोवनातील झाडं महाजनांना हटवायचे आहेत. अहो लाकूडतोड्या बरा होता. कुऱ्हाड गेली देवीने विचारलं सोन्याची तर नाही. चांदीची तर नाही. ओरिजनल दिली. सोन्या चांदीच्या कुऱ्हाडीलाही लाकूडतोड्या भाळला नाही. यांना झाडं छाटायची आहे. स्वतच्या पक्षातील कार्यकर्ते छाटली. बाहेरून झाडं मागवली आणि ती पक्षात लावत आहेत. 2012 साली इथे सत्ता आली. 2017 साली इथे फडणवीस आले.

म्हणाले, नाशिक मी दत्तक घेतो. त्या सर्व गोष्टींना नाशिककर भुलले. आम्ही जी कामे केली होती ते विसरले. दत्तक घेतो म्हटल्यावर बाप परत फिरकलाच नाही. काय काय करतो म्हणून सांगितलं होतं असा टोला मुख्यमंत्री फडणवीसांना लगावला आहे.



