जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२५ । एकीकडे उन्हाचा तडाख्याने अंगाची लाही लाही होत असताना राज्यातील वातावरणात पुन्हा एकदा बदल होऊन अवकाळी पावसाचे संकट ओढवले आहे. जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गारपिटीसह पाऊस झाला असून यामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

साधारण आठवडाभर तापमानात प्रचंड वाढ झाल्यानंतर हवामान विभागाकडून पुन्हा राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार नांदेड, जळगाव जिल्ह्यातील काही भागात पाऊस होत आहे. जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गारपीट झाली आहे.
काल शनिवारी जिल्ह्यातील रावेर तालुक्यात काल झालेल्या गारपिटीमुळे १९ गावांमधील ७३३ शेतकऱ्यांचे सुमारे ५०९ हेक्टरवर केळीचे नुकसान झाले आहे. यात रावेर शहर आणि परिसरातील ३०० हेक्टरवरील केळी पिकाचा समावेश आहे. नुकसान झालेल्या केळीत ऐन कापणीवर आलेल्या केळीचा समावेश आहे
अशातच आज रविवारी दुपारी चोपडा तालुक्यातील अनेक भागात गारपिटीसह जोरदार पाऊस झाला. चोपडा तालुक्यातील अडावद, धानोरा शिवारात गारपिट झाली असून यामुळे शेतातील रब्बी हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यावल तालुक्यातील देखील काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. दरम्यान अवकाळीच्या ढगाळ वातावरणामुळे तापमानाचा पारा चाळीशीच्या खाली आल्याने नागरिकांना उष्णतेच्या झळापासून काहीसा दिलासा मिळाला. मात्र या अवकाळीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे.