जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जानेवारी २०२४ । एकीकडे थंडीचा कडाका वाढला असता दुसरीकडे अवकाळी पावसाचे ढग दाटून आले आहे. गेल्या चार पाच दिवसात राज्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. रब्बी पिकाला मोठा फटका बसलाय. राज्यावर अवकाळीचे सावट अद्यापही कायम आहे. हवामान खात्याने आज (ता. ८) उत्तर महाराष्ट्रात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर धुळे आणि नंदूरबारमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्रमध्ये पश्चिमी वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे वायव्य दिशेकडून येणारे वारे व आग्नेय दिशेकडून येणारे आर्द्रता युक्त वारे यांच्या परस्पर क्रियेमुळे मध्य भारतात तसेच महाराष्ट्रात ढगाळ वातावरण व अति हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
‘या’ जिल्ह्यांत पावसाचा अंदाज
राज्यातील बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूरात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. खान्देशातील काही भाग आणि नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरमध्ये मंगळवारी तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भ वगळता राज्यात पुढील तीन दिवस मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.
धुळे आणि नंदूरबारमध्ये यलो अलर्ट
याशिवाय पुढील तीन दिवसानंतर ढगाळ वातावरण कमी झाल्याने पुन्हा थंडीत वाढ होण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे. अरबी समुद्रावर हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने अवकाळी संकट कोसळल्याचे समोर आले आहे. थंड वारे आणि बाष्पयुक्त वाऱ्याच्या संयोगामुळे काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. सोमवारी धुळे आणि नंदूरबारमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होणार आहे.
जळगावात गारठा वाढणार
दरम्यान, जळगाव जिल्ह्याला उद्या म्हणजेच ९ जानेवारीला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या चार पाच दिवसापूर्वी जळगाव जिल्ह्यात काही भागात झालेल्या अवकाळी पाऊस झाल्याने रब्बी पिकाला मोठा फटका बसलाय. अवकाळीमुळे तापमानाचा पारा घसरला असून यामुळे थंडी वाढली आहे. पुढील तीन दिवसात आणखी थंडी वाढणार आहे.