जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जानेवारी २०२४ । देशासह राज्याच्या वातावरणात सतत बदल पाहायला मिळत आहे. कधी थंडी,तर कधी वाढते तापमान तर कधी ढगाळ वातावरण. अशातच आता राज्यात ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यात देखील पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढणार आहे.
या भागात पावसाचा अंदाज
आग्नेय दिशेने येणाऱ्या बाप्पयुक्त वाऱ्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे पावसाची शक्यता आहे. राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, जळगाव, धुळे, नंदुरबार पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर या भागांत आज शुक्रवारी आणि उद्या शनिवारी हलक्या पावसाचा अंदाज आहे. सोबतच अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, नागपूर येथे शुक्रवारी तुरळक पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.
या भागात अवकाळीच्या बरसल्या सरी
दरम्यान, राज्यातील काही भागात रात्री अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. सांगली शहरात रात्रीच्या सुमारास अचानक अवकाळी पाऊस झाला. बुलढाणा जिल्ह्यात देखील गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या गहू, तुर, मका, हरभरा, गुरांचा चाऱ्याचे नुकसान झाले आहे. मका आणि गहू तर अक्षरशः झोपला आहे.
जळगावमध्ये आगामी दोन दिवस पावसाचा अंदाज
यंदा थंडीच्या मोसमात जिल्ह्यात आतापर्यंत हवी तशी थंडी पडली नाही. त्यातच सध्या जिल्ह्यातील वातावरणात बदल झाला असून आगामी दोन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दोन दिवसापूर्वी रात्री जिल्ह्यातील काही भागात हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. सध्या हवेत गारवा वाढला. यामुळे थंडीचा कडाका वाढला आहे. बदललेल्या वातावरणामुळे रात्रीच्या तापमानात वाढ होऊन पारा १३ अंशावरुन १६ अंशावर आला आहे, तर दिवसाच्या तापमानात घट होऊन ३१ अंशावर असलेला पारा २९ अंशावर आला आहे