जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जुलै २०२२ । हवामान खात्याने राज्यातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार असल्याचा इशारा दिला आहे. आज (दि.23)पासून पुढील २, ३ दिवस राज्यात पावसाचा प्रभाव थोडा अधिक राहील, अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. विदर्भात आज-उद्या जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्याच्या काही भागातही पाऊस पडणार असून जळगाव जिल्ह्यात उद्या २४ जुलैला तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसाने मागच्या दोन दिवसांत थोडी उसंत घेतली होती. परंतु पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. परंतु पावसाचा अंदाज असुनही मुंबईत मात्र पावसाने पाठ फिरविली आहे. मुंबई आणि उपनगरात ढग साचत असले, तरी प्रत्यक्षात पाऊस हुलकावणी देत आहे.
दरम्यान २३ आणि २४ जुलै रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
या जिल्ह्यांना इशारा
२३ जुलै : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली.
२४ जुलै : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, नाशिक, नंदुरबार, जळगाव.