जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२२ । राज्यात पावसाचा जोर कायम आहे. जोरदार पावसामुळे नद्या, नाले तुडुंब वाहत आहे. दरम्यान, पुढील ३ दिवसांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल अशा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्याला देखील आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे नागरिकांनी पावसाचा अंदाज घेतच घराबाहेर पडावं अशा सूचना IMD कडून देण्यात आल्या आहेत.
मागील काही दिवसापासून राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू आहे. येत्या १५ जुलैपर्यंत राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून हवामान खात्याकडून पुढचे दोन दिवस असाच पाऊस राहिल असा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत १४ जुलैपर्यंत पावसाचा ऑरेंज अलर्ट असून यासोबतच पालघर, नाशिक, पुणे यासह ४ जिल्ह्यांमध्ये १५ जुलै या कालावधीत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर धुळे, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, अमरावती, भंडारा, बुलडाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांत यलो अलर्ट देण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यात आज बुधवारी पहाटपासून पाऊस सुरु आहे. मागील काही दिवसात पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे पेरणी कामे आटोप्यात आलेली आहे. दरम्यान, आज जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आलेला असून जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.
जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा
जिल्ह्यात तसेच जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्यास धरणातील पाणी साठ्यात वाढ होऊन पर्यायाने नदीपत्रातील विसर्गात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. आगामी काळात जिल्ह्यात पावसामुळे धरणातून सोडण्यात आलेल्या विसर्गात वाढ झाल्यास जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव नियंत्रण कक्षातर्फे नदीकाठच्या सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की स्थानिक प्रशासनातर्फे दिलेल्या सूचनाचे पालन करावे व खालील प्रमाणे खबरदारी घ्यावी.