⁠ 
शनिवार, मे 4, 2024

सुट्टीवर गेलेला पाऊस उद्यापासून राज्यात पुन्हा सक्रीय होणार, IMD चा काय आहे अंदाज?

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑगस्ट २०२३ । जुलै महिन्यात धो-धो पडलेला पाऊस ऑगस्ट महिन्यात गायब झाला आहे. मागील गेल्या काही दिवसपासून पावसाने दडी मारली आहे. यामुळे शेतकरी राजा चिंतेत सापडला आहे. पाऊस कधी परतेल याची प्रतीक्षा शेतकरी करत आहे. अशातच मात्र सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ओढ दिलेला पाऊस उद्यापासून राज्यभरात पडण्याची शक्यता आहे.

काय आहे हवामान खात्याचा अंदाज?
गेल्या ४-५ दिवसांपासून पावसाने राज्यात विश्रांती घेतली आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकणात उद्यापासून पावसाला सुरुवात होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काही भागात येलो अलर्ट देखील असण्याची शक्यता आहे.

राज्यात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाने काही काळ ओढ दिली होती. मात्र येत्या १८ आणि १९ ऑगस्ट रोजी राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार 18 ते 24 ऑगस्ट दरम्यान पाऊस पुन्हा एकदा जोर धरेल.

विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी पाहायला मिळेल. तर, पश्चिम, मध्य आणि दक्षिम महाराष्ट्रात मात्र पावसाची ये-जा असेल. तर मराठवाड्यातही विविध भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम, मध्य आणि दक्षिम महाराष्ट्रात मात्र पावसाची ये-जा असेल.

दरम्यान, सध्या राज्यासह जळगाव जिल्ह्यातही पावसाने विश्रांती घेतली असल्यामुळे सुरुवातीच्या पावसात झालेली पिकांची लागवड धोक्यात आली आहे. आता पाऊस झाला नाही तर दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर आहे. जिल्ह्यामध्ये सध्या ऊन सावलीचा खेळ सुरु आहे. तर काही ठिकाणी अधूनमधून हलक्या पावसाच्या सरी कोसळत आहे. शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पावसाळ्याचे अडीच महिने उलटले तरी देखील जिल्ह्यातील अनेक प्रकल्प देखील खाली आहे. त्यामुळे पाणीटंचाईची शक्यता आहे.