जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२२ । महाराष्ट्रात पावसाने (Maharashtra monsoon update) म्हणावा तसा जोर धरलेला नाही. राज्यातील काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी दडी मारल्याचे दिसून येतेय. पावसाने दडी मारलेल्या भागात दुबार पेरणीचे संकट आले असून शेतकरी पावसाची प्रतिक्षा करीत आहे. याच दरम्यान, कोकण किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, मुंबई उपनगरसह कोकणामध्ये पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात मंगळवारी जोरदार सरींनी हजेरी लावली आहे. सिंधूदुर्ग, रायगड, पुणे, परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. तर घाटमाथ्यावरही पावसाचा काहीसा जोर दिसून आला. उर्वरित राज्यात मात्र ढगाळ हवामान, उन्हाचा चटका, हलक्या सरी असेच चित्र पाहायला मिळत आहे.
जळगाव शहरासह परिसरात आज दुपारी पावसाच्या सरी कोसळल्या. मात्र हवं तसा पाऊस झालेला नाहीय. गेल्या काही दिवसापूर्वी जिल्ह्यात ज्या भागात सुरूवातीला पाऊस झाला त्या भागात घाईने शेतकऱ्यांनी (farmer) पेरण्या केल्या परंतु पाऊस थांबल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. सगळ्यानाच पावसाची प्रतिक्षा लागून राहिली आहे.
दरम्यान, पुढील चार ते पाच दिवसांमध्ये संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय राहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने मुंबई, मुंबई उपनगरसह कोकणामध्ये पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सकाळपासूनच मुंबईमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबईसह नवी मुंबई, ठाणे आणि वसई विरारमध्ये पावसाचा जोर वाढला होता.
संपूर्ण कोकण, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागात हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून मुंबई महापालिकेला अलर्टवर राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.