जळगाव लाईव्ह न्यूज । ७ सप्टेंबर २०२२ । मागील काही दिवसाच्या खंडानंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे येत्या तीन दिवसांत गणपती विसर्जनदरम्यान राज्यात गडगडाटासह पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे. आज बुधवारपर्यंत राज्यात गडगडाटासह पावसाची शक्यता असून त्यानंतर गुरुवार-शुक्रवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात होईल. जळगाव जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
आज या भागांना पावसाचा इशारा..
हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज (ता. ७) विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकणात विजांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर उर्वरित राज्यात कमाल तापमान आणि उकाड्यातील वाढ कायम राहून, बगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यातील काही जिल्हे सोडता अनेक भागांत वादळी वारे, विजांसह पावसाने थैमान घातले आहे.. दिवसभर उन्हाचा चटका आणि उकाड्यानंतर दुपारी पाऊस हजेरी लावत आहे. जळगाव जिल्ह्यात दिवसभर उन्हाचा चटका त्यांनतर सायंकाळी काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी बरसत आहे. उकाडा वाढल्याने जळगावकर हैराण झाले आहे. मात्र ९ सप्टेंबर रोजी जळगाव जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार असल्याने उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. सोबत मराठवाडा आणि विदर्भातही पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.
अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. मात्र १० सप्टेंबरनंतर पावसाचा जोर ओसरलेला असेल.