जळगाव लाईव्ह न्यूज । ४ एप्रिल २०२४ । जळगावसह राज्यात तापमानाचा पारा ४० अंशावर गेल्याने उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहे. मात्र लवकरच उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. राज्यात हवेची द्रोणीय परिस्थिती निर्माण झाली आहे, म्हणजेच कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे जळगाव जिल्ह्यासह राज्यात आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. आर्द्रता वाढल्याने पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भारतीय हवामान विभागाने राज्यात पुढील चार दिवस अवकाळीचा इशारा दिला आहे. ५ एप्रिलपासून जळगावसह राज्यामध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविला आहे. आज राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे
दक्षिण तमिळनाडू ते पूर्व विदर्भापर्यंत हवेच्या खालच्या स्तरात एक द्रोणिका रेषा तयार झाली आहे. ही रेषा कर्नाटक आणि मराठवाड्यावरून जात आहे. त्याचा परिणाम पावसावर होणार आहे. जळगाव जिल्ह्यात ५ ते ८ एप्रिलदरम्यान वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून (आयएमडी) वर्तविण्यात आला आहे. यामुळे जळगावकरांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. मात्र, वादळी वाऱ्यांची शक्यता असल्याने केळीला फटका बसू शकतो.
या भागात पावसाचा अंदाज
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये ताशी 30 ते 40 किमी वेगाने तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.