जळगाव लाईव्ह न्यूज । १२ नोव्हेंबर २०२४ । जळगाव जिल्ह्यात सध्या थंडीची चाहूल लागली असून यामुळे ऑक्टोबर हीटपासून जळगावकरांना दिलासा मिळाला. शेतकरी वर्गही रब्बी हंगाम पेरणीला लागला आहे. मात्र यातच महिनाअखेरीस पुन्हा एकदा पावसाची शक्यता देखील निर्माण झाली आहे.
बंगालची खाडी, अंदमान निकोबार भागात समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असल्याने नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस दक्षिण भारतात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा प्रभाव विदर्भ, खान्देशवरही काही प्रमाणात जाणवणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात काही प्रमाणात पाऊस पडेल. तर काही दिवस ढगाळ वातावरण असेल.
यंदा ऑक्टोबर हीटमुळे नोव्हेंबरमध्ये देखील दुपारी उन्हाचा चटका वाढलेला आहे. आठ, दहा दिवसात दुपारी तापमान जास्तच राहणार आहे. १७ नोव्हेंबर पासून जिल्ह्यातील पहाटे व दुपारच्या तापमानात दोन ते तीन अंशांची घट होऊन नियमित हिवाळ्यास सुरुवात होईल. ११ नोव्हेंबर रोजी पहाटे १६ अंश तापमानाची नोंद झाली आहे. तर दुपारी पारा ३४ अंशांवर पोहोचला होता. त्यामुळे दुपारी उष्णता जाणवत होती. नोव्हेंबर अखेर अल्प पाऊस पडणार असून, पिकांना धोका निर्माण होईल, अशी माहिती हवामान अभ्यासक यांनी दिली आहे.