जळगाव लाईव्ह न्यूज | २४ सप्टेंबर २०२३ । सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. 27 सप्टेंबरपर्यंत संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. दरम्यान आज रविवारी जळगावसह राज्यातील बहुतांश भागात पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने आज विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
कोणत्या जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट?
राज्यातील ठाणे, पालघर, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे , छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यात जुलैनंतर या महिन्यात चांगला पाऊस झाला. जून आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने निराश केलं. दरम्यान, गेल्या महिन्यात पावसाने दिलेल्या ओढमुळे खरीपाची पिके करपू लागली होती. परंतु मागील काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यात पावसाने चांगली हजेरी लावल्याने पिकांना नवीन संजीवनी मिळाली असून शेतकरी वर्ग सुखवला आहे.
या आठवड्यात पावसाने दोन तीन विश्रांती घेतली होती. यादरम्यान उन्हाचा चटका वाढला होता. उकाडाही जाणवत होता. मात्र आता पुन्हा पावसाचा अंदाज आहे. आज रविवारी पहाटपासून ढगाळ वातावरण असून वातावरणात गारवा निर्माण झालाय. आज जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान, मागील काही दिवसापूर्वी झालेल्या पावसाने जिल्ह्यातील प्रकल्पमध्ये पाणी झाल्याने जळगावकरांना दिलासा मिळाला आहे. आता परतीचा पाऊस बाकी असून या दरम्यान जोरदार पाऊस झाल्यास जिल्ह्यातील लहान मोठे धरण भरण्याची अपेक्षा आहे