जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जुलै २०२४ । राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर कायम असून पुढील ३ दिवस पावसाची अशीच परिस्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. दरम्यान, आज १३ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट तर काही ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आला असून अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
या जिल्ह्यांना अलर्ट जारी
दरम्यान, भारतीय हवामान खात्याने आज रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरीतील पावसाची स्थिती बघता प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रायगड, पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.
दुसरीकडे मागील तीन ते चार दिवसात विदर्भातील अनेक ठिकाणी पावसाने धुमाकूळ घातला असून आता विदर्भात पावसाचा जोर काहीसा ओसरण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पावसाचा अंदाज आहे.
उत्तर आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विजांचा कडकडाट असल्यामुळे नागरिकांना झाडाखाली थांबू नये, असा सल्लाही देण्यात आलाय. तसेच मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार आणि विदर्भ या भागाला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. समुद्रकिनारी तसेच घाटमाथ्यावर पर्यटनासाठी गेलेल्या नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.
जळगावमधील पावसाची स्थिती?
सोमवारी जिल्ह्यात दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होती. आज देखील जिल्ह्यात सर्वत्र हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. २६ जुलैपर्यंत मान्सून सक्रिय राहणार असून या काळात ढगाळ वातावरण राहणार आहे. मात्र २७ तारखेनंतर पावसाची खंड पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.