जळगाव लाईव्ह न्यूज । २२ डिसेंबर २०२५ । भारतीय रेल्वेनं रेल्वे तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून ही नवीन दरवाढ २६ डिसेंबरपासून लागू होणार आहे. या दरवाढीनुसार जनरल तिकीटावर प्रवास करणाऱ्यांसाठी 215 किमीपर्यंत कोणतेही दर वाढवण्यात आलेले नाहीत. मात्र २१५ किमीपासून पुढील अंतरासाठी प्रति किलोमीटर १ पैसा अशा प्रकारे वाढवण्यात आले आहेत. मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या नॉन-एसी श्रेणीत व एसी श्रेणीत प्रति किलोमीटर २ पैसे भाडेवाढ केली आहे.

भारतीय रेल्वेनं २०२५ मध्ये दुसऱ्यांदा प्रवास भाडे वाढवलं आहे. यापूर्वी जून महिन्यात रेल्वेनं प्रवासभाडे वाढवण्याचा निर्णय घेतला होता. १ जुलै २०२५ पासून रेल्वे प्रवास भाडे वाढवण्यात आले होते. त्यानंतर आता पाच महिन्यातच रेल्वेनं प्रवास भाडे वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र उपनगरीय सेवा आणि मासिक पासधारकांच्या भाड्यात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.

असा पडेल खिशावर भारः
जर जळगाव ते मुंबई अंतर ४८६ किलोमीटर मानले, तर नॉन-एसी आणि एसी तिकिटात सुमारे ९ रुपयांची वाढ होईल. म्हणजेच सुपरफास्ट एक्सप्रेसचे एसी-३ चे सध्याचे ७४० रुपयांचे तिकिट ७४९ रुपये होईल. तर जळगावहून नवी दिल्ली अंतर १०६७ किमी असल्याने या मार्गावरील धावणाऱ्या एक्सप्रेसचे नॉन एसी आणि एसी तिकीटात २१ रुपयांची वाढ होईल.ते नवी दिल्ली एक्स्प्रेसच्या प्रवासासाठी स्लीपर कोचचे तिकीट ५२० रुपये आहे, ते आता ५४१ रुपये होणार आहे. हे दर सुपरफास्ट, मेलनूसार बदलतील.

जळगावहून कुठे-किती भाडे वाढ?
| कुठपर्यंत | अंतर (किमी) | भाडे जास्त |
| मुंबई | 486 | 9 |
| नवी दिल्ली | 1067 | 21 |
| अमृतसर | 1500 | 30 |
| पुणे | 460 | 9 |
| भोपाळ | 440 | 9 |
| अहमदाबाद | 595 | 11 |
(नोट: अंतर व नवीन दरांनुसार स्लीपर व एसीचे अंदाजित वाढीव भाडे रुपयांत)





